मुंबई, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मराठी आणि हिंदी चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले. त्या ८१ व्या वर्षांच्या होत्या. सीमा देव यांनी जवळपास ८० मराठी आणि हिंदी चित्रपटांतून काम केले. वयोमानामुळे मागील वर्षभरापासून त्या आजारी होत्या. त्यांना अल्झायमर पण झाला होता.
सीमा देव त्यांचा मुलगा अभिनेता अभिनय देव यांच्यासोबत मुंबईत वांद्रे येथील घरात वास्तव्यास होत्या. राहत्या घरी सीमा देव यांनी गुरुवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. सीमा यांच्या पार्थिवावर गुरुवारी संध्याकाळी साडेचार वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
सीमा यांचे लग्नाआधीचे नाव नलिनी सराफ असे होते. मुंबईतल्या गिरगावात त्यांचे बालपण गेले. दुर्गा खोटे, सुलोचना, ललिता पवार या अभिनेत्रींच्या मार्गदर्शनात सीमा देव यांनी अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यास सुरुवात केली. याआधी आनंदजींच्या ऑर्केस्ट्रामध्ये सीमा देव गाणं गायच्या. गाणं आणि नृत्याची आवड यामुळेच त्यांनी नंतर चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. पण त्या काळात सारस्वत गौड समाजात मुली-महिलांनी गाणे-बजावणे करणे हा अपराध समजला जात होता. यामुळे समाजाशी संघर्ष करत सीमा देव यांना मनोरंजनसृष्टीत काम करावे लागले.
सीमा देव यांनी १९५७ मध्ये ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे त्यांचे चित्रपट गाजले. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका असलेल्या हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ मधील त्यांची भूमिका आजही अनेकांना लक्षात आहे.