नाशिक : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ध्रुवनगरमध्ये 26 वर्षीय वरुण भामरे याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वरुण भामरे याने राहत्या घरी मृत्यूला कवटाळलं. दरम्यान, आत्महत्येपूर्वी वरुणने चिठ्ठीत लिहित त्याच्या प्रेयसीला मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. गंगापूर पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली असून वरुणच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नेमकं काय घडलं
वरुणचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तरुणी त्याला वारंवार धमकी देत असल्याचं तपासात समोर आलं आहे. वरुणने स्वत:ला संपवण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. ज्यामध्ये त्याने आपल्या प्रेयसीवर आणि आणखी दोघांवर गंभीर आरोप केले आहेत. तरुणीने मला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं, माझ्याकडून हवे तेवढे कॅश काढून घेतले. प्रेयसीने आणखी दोघांसोबत काल रस्त्यात अडवून मारहाण केली, तू मर नाही तर…, अशी धमकी दिल्याचा आरोप वरुणने आपल्या अखेरच्या नोटमध्ये केला आहे. वरुणला जेव्हा आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं, त्यानंतर त्याने प्रेयसीकडून आपले पैसे परत मागितले. मात्र तिने वरूणला धमकी दिली अन् मारहाण देखील केली. वरुणने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे चिठ्ठीतून न्यायाची मागणी केली आहे. आरोपींना शिक्षा करा, अशी वरुणने अखेरची इच्छा व्यक्त केली आहे.