Maharashtra Weather Alert : राज्यात सध्या हवामानाचा लपंडाव पाहायला मिळत असून एका बाजूला उन्हाचा कडाका तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धुमाकूळ घातला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या वादळी पावसामुळे रब्बी पिकांचे आणि फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील 24 तास राज्यावर संकट कायम असल्याचे सांगत अनेक जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीचा तडाखा
विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला असून पिकांचे नुकसान खालीलप्रमाणे झाले आहे:
– बुलढाणा व वाशिम: चिखली, मेहकर, खामगाव आणि रिसोड परिसरात जोरदार गारपीट झाली. गहू, हरभरा आणि कांदा पिकाला याचा मोठा फटका बसला आहे.
– अमरावती व अकोला: अंजनगाव सुर्जी आणि अकोट तालुक्यातील 15 ते 20 गावांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे गारपीट झाली, ज्यामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले आहे.
– जालना: जालना आणि बदनापूर तालुक्यात मोसंबी, आंबा, द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
उत्तर महाराष्ट्र आणि सोलापूरची स्थिती
नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. निफाड तालुक्यातील शिरवाडे वाकदा आणि उगाव परिसरात जोरदार गारपीट झाली, ज्याचा फटका द्राक्ष बागांना बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि माढा तालुक्यातही गारा पडल्याने कांदा, गहू आणि ज्वारीची पिके आडवी झाली आहेत. सोलापूरमध्ये ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून येथे 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
हेही वाचा – Raj Thackeray : 'ते इन्स्टाग्राम बघणं बंद करा…', राज ठाकरेंचा थेट सोशल मिडियावरच हल्लाबोल, पण का?
पुढील 24 तासांचा हवामान अंदाज (20 March 2026)
हवामान विभागाने 20 मार्चसाठी राज्याच्या विविध भागांत पावसाचा इशारा दिला आहे:
– यलो अलर्ट: सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.
– कोकण विभाग: मुंबई, ठाणे आणि रत्नागिरीत उष्ण व दमट हवामान राहील. मुंबईचे कमाल तापमान 32-36 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
– विदर्भ: नागपूरमध्ये कमाल तापमान 34-38 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, तर वर्धा आणि गडचिरोलीत हलक्या पावसाची शक्यता आहे.
शेतकऱ्यांपुढे मोठे संकट
अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीला आलेली पिके हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने येत्या 2 ते 3 दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला असल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, वाढलेली आर्द्रता आणि उन्हाचा चडाखा यामुळे उकाडा देखील तीव्र जाणवणार आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.