रशिया-युक्रेनमध्ये गेल्या महिन्याभरापासून युद्ध सुरू आहे. आज रशिया-युक्रेन युद्धाचा ३७वा दिवस आहे. रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरू आहे तर युक्रेनही रशियाला जशास तसे उत्तर देत आहे. युक्रेनचा आक्रमक पवित्रा कायम असून युक्रेनने रशियातील इंधन डेपोवर हवाई हल्ला केला आहे.
युक्रेनियन सीमेजवळ असलेल्या बेल्गोरोड या रशियाच्या शहरातील इंधन डेपोत शुक्रवारी आग लागली. युक्रेनच्या दोन हेलिकॉप्टर्सनी तेल डेपोवर गोळीबार केला. या गोळीबारामुळे ही आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत दोन नागरिक जखमी झाले आहेत. डेपोला लागलेल्या भीषण आगीनंतर शहरातील तीन रस्त्यांवरील रहिवाशांना बाहेर काढण्यात येत आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने आपल्या भूभागावर युक्रेनियन हवाई हल्ल्याची कबुली दिली असल्याची ही पहिलीच वेळ आहे.