Ujani Dam Suckermouth Catfish Removal Campaign: दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातून भारतात काचपेटी (एक्वेरियम) व्यापाराद्वारे आलेला 'सकरमाउथ कॅटफिश' सध्या उजनी जलाशयासाठी महाभयंकर संकट ठरला आहे. स्थानिक पातळीवर 'हेलिकॉप्टर मासा' म्हणून या उपऱ्या माशाला ओळखले जाते. घरी शोभेसाठी माशांची पेटी ठेवणारे लोक या माशाला मोठे झाल्यावर नदी-नाल्यांमध्ये सोडून देतात. हा मासा स्थानिक माशांची अंडी खातो, नदीपात्रात बिळे करतो आणि तळाशी राहणाऱ्या देशी माशांचे अन्न हिरावून घेतो. खाण्यासाठी निरुपयोगी असलेल्या या माशामुळे उजनीतील स्थानिक गोड्या पाण्यातील माशांच्या अस्तित्वालाच सुरुंग लागला आहे.
उजनीत तब्बल 97 टक्के परदेशी माशांचा कब्जा; भीमा नदीकाठाची धूप
गेल्या दोन दशकांत उजनी धरणातील जैवविविधतेचे चित्र पूर्णपणे पालटले आहे. एकेकाळी 100 टक्के स्थानिक मासे असलेल्या या जलाशयात आता तब्बल 97 टक्के परदेशी मासे आढळतात, तर देशी माशांचे प्रमाण अवघे 3 टक्के उरले आहे. या 97 टक्क्यांपैकी 30 ते 40 टक्के वाटा एकट्या सकरमाउथ कॅटफिशचा आहे. प्रजननासाठी हा मासा भीमा नदीच्या पात्रात आणि काठांवर मोठी बिळे करतो, ज्यामुळे नदीपात्राची धूप होऊन भविष्यात धरणाचा मातीचा भराव कमकुवत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अगदी भीमाशंकर या उगमस्थानापर्यंत या अत्यंत चिवट माशाचा प्रसार झाला आहे.
मच्छिमारांचे उत्पन्न घटले; दर 15 दिवसांनी नवे जाळे खरेदी करण्याची नामुष्की
भिगवण आणि परिसरातील सुमारे 20,000 हून अधिक मच्छिमार व व्यावसायिक या उजनी जलाशयावर अवलंबून आहेत. मात्र सकरमाउथ आणि चिलापी (तिलापिया) या परदेशी माशांच्या अतिक्रमणामुळे त्यांचे दैनंदिन उत्पन्न कमालीचे घटले आहे. स्थानिक मच्छिमारांच्या मते, जाळ्यात सापडणाऱ्या माशांमध्ये 70 ते 80 टक्के प्रमाण या उपऱ्या माशांचेच असते. हा कॅटफिश जाळ्यात अडकल्यावर तो काढताना जाळे कापून काढावे लागते, ज्यामुळे मच्छिमारांना दर 15 ते 20 दिवसांनी 1,500 रुपये खर्चून नवीन जाळे खरेदी करावे लागत आहे.
बीएनएचएसचा (BNHS) अनोखा उपक्रम; भिगवणमध्ये देशातील पहिले संकलन केंद्र
या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (BNHS) डॉ. उन्मेष काटवटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक मच्छिमारांच्या सहकार्याने निर्मूलनाची विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी भिगवण मत्स्य बाजारात भारतातील पहिले 'सकरमाउथ कॅटफिश संकलन केंद्र' उभारण्यात आले आहे. मच्छिमारांनी हे मासे फेकून न देता किंवा पुन्हा पाण्यात न सोडता जमा करावेत, म्हणून त्यांना लिलावाच्या दराव्यतिरिक्त प्रति किलो 2 रुपये अतिरिक्त बोनस दिला जातो, ज्यामुळे या माशांना बाजारात 30 ते 35 रुपये प्रति किलो दर मिळत आहे.
36 टनांहून अधिक माशांचा उपसा; खतासाठी रत्नागिरी-तळोजातील ऑइल मिल्समध्ये पाठवणी
या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत उजनी जलाशयातून 36 टनांपेक्षा जास्त सकरमाउथ कॅटफिश बाहेर काढण्यात आले आहेत. बाहेर काढलेले हे मासे तळोजा आणि रत्नागिरी येथील ऑइल मिल्समध्ये प्रक्रियेसाठी पाठवले जातात, जिथे त्यांच्या मळीपासून वनस्पतींसाठी उत्तम जैविक खत तयार केले जाते. अमेरिकेतही अशा प्रकारची समस्या उद्भवली होती, परंतु लोकसहभागातून राबवलेला भारतातील हा पहिलाच यशस्वी प्रयोग ठरला आहे. केंद्र सरकारने अशा परदेशी माशांच्या आयातीवर बंदी घालावी, अशी मागणीही तज्ज्ञांकडून केली जात आहे.
हेही वाचा – Flamingo Birds at Bamnoli: कोयनेच्या निळ्याशार पात्रात गुलाबी लाट; शिवसागर जलाशयात परदेशी फ्लेमिंगोंचे आगमन
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.