Aadhaar Card Update : आधार कार्ड हे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी ओळखीचा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज बनले आहे. मात्र, अनेकदा आधारमधील नाव, जन्मतारीख किंवा पत्ता यामध्ये चुका आढळतात. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने आधारमधील माहिती अपडेट करण्यासाठी अत्यंत कडक नियम लागू केले आहेत. हे नियम 2019 पासून लागू असून 2026 मध्येही तेच कायम आहेत. आधार डेटाची सुरक्षितता आणि विश्वासार्हता जपण्यासाठी हे बदल किती वेळा करता येतात, यावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
नाव, जन्मतारीख आणि लिंग बदलासाठी 'इतक्याच' संधी
आधारमधील मूळ माहिती बदलण्यासाठी UIDAI ने ठराविक मर्यादा निश्चित केल्या आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे –
– नाव (Name): आधार कार्डवरील नाव तुम्ही आयुष्यात फक्त 2 वेळाच बदलू शकता. यात लग्नानंतरचे आडनाव बदलणे किंवा स्पेलिंगमधील चुका सुधारण्याचा समावेश होतो.
– जन्मतारीख (DOB): जन्मतारीख बदलण्याची संधी केवळ 1 वेळाच दिली जाते. यासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यांसारखे वैध पुरावे आवश्यक आहेत.
– लिंग (Gender): आधारवरील लिंग बदल देखील जीवनकाळात फक्त 1 वेळाच करता येतो. तृतीयपंथी व्यक्तींनाही या मर्यादेत राहूनच सुधारणा करावी लागते.
पत्त्याबाबत नियमावलीत मोठी शिथिलता
नाव आणि जन्मतारखेप्रमाणे पत्ता बदलण्यावर कोणतीही मर्यादा नाही. नोकरी, शिक्षण किंवा इतर कारणांमुळे अनेकजण वारंवार घरे बदलतात, ही बाब लक्षात घेऊन UIDAI ने पत्ता बदलण्यासाठी लवचिकता ठेवली आहे. तुम्ही हवा तितक्या वेळा आधारवरील पत्ता अपडेट करू शकता. यासाठी बँक पासबुक, मतदान ओळखपत्र किंवा वीज बिल यांसारख्या कागदपत्रांची गरज असते. तसेच, मोबाईल नंबर बदलण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी आधार केंद्रावर जावे लागते, त्यावरही कोणतीही मर्यादा नाही.
अपडेटची प्रक्रिया आणि शुल्क
आधार अपडेट करण्यासाठी तुम्ही 'myAadhaar' पोर्टलचा वापर करू शकता किंवा जवळच्या आधार केंद्राला भेट देऊ शकता. नाव किंवा जन्मतारीख यांसारख्या डेमोग्राफिक अपडेटसाठी साधारणपणे 50 रुपये शुल्क आकारले जाते. जर एखाद्या व्यक्तीला मर्यादेपेक्षा जास्त वेळा नाव बदलायचे असेल, तर त्याला UIDAI च्या प्रादेशिक कार्यालयातून विशेष परवानगी घ्यावी लागते आणि गॅझेट नोटिफिकेशन सादर करावे लागते. कागदपत्रांमधील त्रुटींमुळे तिसऱ्यांदा बदल करण्याची विनंती सामान्यतः नाकारली जाते, त्यामुळे नागरिकांनी पहिल्याच वेळी अचूक माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा – UPI मोफत असूनही PhonePe आणि GooglePay कसे कमावतात कोट्यवधी? समजून घ्या या कंपन्यांच्या कमाईचे गुपित
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.