नाशिक शहरातील मानेनगर परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. घराच्या गॅलरीत असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. तृप्ती विशाल सोनवणे (8) आणि स्वस्ति विशाल सोनवणे (6) अशी मृत मुलींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मानेनगरातील शुभम कॉलनीमध्ये सोनवणे कुटुंबीय वास्तव्यास आहे. मुलींचे वडील वैद्यकीय व्यवसायात असून त्यांचे क्लिनिक जवळच आहे. शनिवारी सायंकाळी रुग्णांवर उपचार सुरू असल्याने आई-वडील काही काळ क्लिनिकमध्ये होते. त्यानंतर वडील घरी गेले आणि दोन्ही मुलींना जेवण दिले. आई काही वेळात घरी येणार असल्याचे सांगून ते पुन्हा क्लिनिकमध्ये परतले.
दरम्यान, रात्री उपचार घेत असलेल्या रुग्णाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुलांची आई घरी रवाना झाली. घरी पोहोचल्यानंतर दोन्ही मुली नेहमीच्या ठिकाणी दिसत नसल्याने त्यांनी त्यांचा शोध सुरू केला. घरातील विविध ठिकाणी पाहिल्यानंतर गॅलरीतील पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. संशय आल्याने टाकीत पाहिले असता एका मुलीचे केस पाण्यावर दिसून आले. दोन्ही मुलींना तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघींनाही मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. दोन्ही बहिणींवर रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे सोनवणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.