छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गणपती आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीला गालबोट लागलं आहे. चित्तेपिंपळगाव-करमाड मार्गावरील पिंप्रीराजा गावच्या वळणावर मिरवणुकीत घुसलेल्या कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. विठ्ठल राममाळ जाधव आणि रमेश लहुजी बनसोडे अशी मृत शेतकऱ्यांची नावं आहेत. गणपती आगमन सोहळ्यासाठी गावात तयारी सुरू असताना हा अपघात झाला. मिरवणुकीसाठी रस्त्यावर गर्दी जमलेली असतानाच भरधाव कंटेनर मिरवणुकीत घुसला आणि दुचाकीस्वारांना चिरडत पुढे गेला. अपघातानंतर जखमींना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे पिंप्रीराजा परिसरात हळहळ व्यक्त होत असून गणपती विसर्जनाच्या आनंदावर दुःखाचं सावट पसरलं आहे.