आयएएस तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारताच राज्यभरात धडाधड धाडी टाकून भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या या कामगिरीचं राज्यभरातून कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वीच सुट्टं तेल विकणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा मुंढे यांनी दिला होता, तसेच सुट्टं तेल ग्राहकांनी खरेदी करू नये, असं आवाहानही त्यांनी केलं होतं. अशातच आता महाप्रसादासाठी एफडीएकडून कडक नियम लागू करण्यात आले आहे. प्रसादातील निष्काळजीपणामुळे अन्नातून विषबाधे सारखे प्रकार घडू नये म्हणून एफडीए ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.
आगामी सणसमारंभासह उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात महाप्रसादांचं केलं जाणार आयोजन बघता एफडीएने कंबर कसली असून महाप्रसादासाठी अधिकृत परवाना किंवा नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. विनापरवाना महाप्रसाद आयोजित केल्यास आयोजकांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहे. महाप्रसाद करत असताना स्वच्छता, मास्क, हातमोजे आणि आरओचं पाणी देणे बंधनकारक असणार आहे. अन्नाचा दर्जा, स्वच्छता राखण्यासाठी एफडीएने काही अटी पाळण्याच बंधनकारक केल आहे.
त्यानुसार, महाप्रसादाचा स्वयंपाक बनविण्यासाठी तसेच पिण्यासाठी आरओ पाण्याचा वापर करावा लागणार आहे. महाप्रसाद बनविणाऱ्या आणि वाटणाऱ्या स्वयंसेवकांना डोक्यावर टोपी घालणे बंधनकारक केले आहे. शिळे अन्न भाविकांना वाटप केल्यास आयोजकांवर कठोर कारवाई केली जाणार. तसेच महाप्रसादाचे अन्न साठवण्यासाठी आणि वाटपासाठी केवळ स्टेनलेस स्टील आणि अन्नसुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित असलेल्या भांड्याचाच वापर करावा लागणार आहे. आयोजकांना सोय व्हावी यासाठी एफडीएने नोंदणी प्रक्रिया अत्यंत सुलभ केली असून अवघ्या शंभर रुपयात ऑनलाईन नोंदणी पद्धतीने परवाना प्राप्त होणार आहे.
दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांवर FDAकडून कारवाई केली जाऊ शकते. सण-उत्सवांच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक महाप्रसादाचा लाभ घेत असल्याने अन्नातून विषबाधा किंवा आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी हे नियम लागू करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.