अन्न व औषध प्रशासन विभागाची धुरा हाती घेतल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवायांची जोरदार चर्चा सुरू आहे. भेसळयुक्त आणि निकृष्ट खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात त्यांनी कठोर भूमिका घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि उपहारगृहांवर कारवाई केली जात आहे. त्यांच्या या कामाचे नागरिकांकडून कौतुक होत असतानाच आता तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका छोट्याशा पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे. आता त्यांच्या नुकत्याच केलेल्या तीन ओळींच्या पोस्टमधूनही हीच भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे.
मुंढेंनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?
तुकाराम मुंढे यांनी आपल्या पोस्टसोबत एका इंग्रजी वृत्तपत्रातील बातमी शेअर केली आहे. या वृत्तामध्ये त्यांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करताना गेल्या 20 वर्षांत त्यांची 21 वेळा बदली झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही बातमी शेअर करताना मुंढे यांनी योग्य गोष्टीच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याचा संदेश दिला. योग्य गोष्ट करणे सोपे नसते, अशाच वेळी नेतृत्वाची खरी परीक्षा होते, असा आशय त्यांनी व्यक्त केला आहे.
Stand by What’s right Leadership is tested when doing the right thing is not the easiest thing to do.
Positions change. Circumstances change. Principles must endure.#TukaramMundhe #Leadership #Inspiration #public pic.twitter.com/2v4Pv1PlKd — Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) August 12, 2026
“पदं बदलतात, परिस्थिती बदलते; मात्र तत्त्वे अढळ राहिली पाहिजेत,” असा स्पष्ट संदेश त्यांच्या पोस्टमधून देण्यात आला आहे. सध्या अन्न व औषध प्रशासन विभागातील त्यांच्या कारवायांमुळे ते चर्चेत असतानाच या पोस्टमुळे त्यांच्या कामाच्या पद्धतीची आणि तत्त्वनिष्ठ भूमिकेची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी त्यांच्या या विचारांचे कौतुक केले आहे.