मुंबई: दूध, पनीर आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळीनंतर आता अन्न व औषध प्रशासनाने खाद्यतेलाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग, सेव्ह महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत खाद्यतेलाच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतच्या संपूर्ण साखळीची तपासणी केली जाणार असल्याची माहिती FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.
तपासणीत भेसळीचे प्रकार उघड
खाद्यतेलाच्या मानकांची तपासणी करताना काही गंभीर अनियमितता आढळल्याचे मुंढे यांनी सांगितले. नोंदणी नसलेल्या काही तेल उत्पादक आस्थापनांचा शोध लागला असून खाद्यतेलात अनधिकृत मिश्रण केल्याचेही समोर आले आहे. विशेषतः मोहरीच्या तेलात परवानगी नसलेले मिश्रण केल्याच्या प्रकारांवर FDA ची नजर आहे.
याशिवाय, मुदत संपलेल्या तेलाचे पुन्हा पॅकिंग करून ते बाजारात आणण्याचे प्रकारही निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय केवळ आर्थिक फसवणुकीपुरता मर्यादित नसून गंभीर आरोग्यविषयक प्रश्न असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
सुट्ट्या तेलाच्या विक्रीवर पुन्हा भर
खाद्यतेल सुट्या स्वरूपात विकण्यास आधीपासूनच नियमांनुसार मनाई आहे. त्यामुळे ग्राहकांनीही उघडे किंवा सुटे तेल खरेदी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तेलाची विक्री योग्य पॅकेजिंगमध्येच होणे अपेक्षित आहे.
किरकोळ विक्रेत्यांनीही सुट्या स्वरूपात तेल घेणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले. खाद्यतेलाशी संबंधित उत्पादक, वितरक, किराणा दुकानदार आणि ऑनलाइन विक्रेत्यांनाही लागू असलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. या क्षेत्रातील आस्थापनांसाठी अनुपालन आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
मोहरीच्या तेलात मिश्रणाला मनाई
मोहरीचे तेल म्हणून विक्री होत असलेल्या उत्पादनात अनधिकृतरीत्या दुसऱ्या तेलाचे मिश्रण करता येणार नाही. उत्पादनाची माहिती, पॅकेजिंग, लेबल आणि सील यांचीही तपासणी केली जाणार आहे.
तसेच खाद्यतेलाचे जुने टिन किंवा पॅकिंग पुन्हा वापरण्याचे प्रकारही थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुदत संपलेले तेल पुन्हा पॅक करून विकणे हा गंभीर प्रकार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हॉटेल्समध्ये वारंवार तळणीचे तेल वापरल्यास कारवाई
हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून एकाच तेलाचा वारंवार तळणीसाठी वापर केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. अशा तेलाचा पुनर्वापर टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे. घरगुती वापरातही तळणीचे तेल पुन्हा पुन्हा वापरू नये, असे आवाहन करण्यात आले.
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
ग्राहकांनी सुटे खाद्यतेल खरेदी न करता पॅकबंद तेलालाच प्राधान्य द्यावे. पॅकेट किंवा बाटली घेताना सील व्यवस्थित आहे का, लेबलवरील माहिती काय आहे आणि उत्पादनाची मुदत संपलेली नाही ना, हे तपासावे.
भेसळ किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपासून आजन्म कारावासापर्यंत शिक्षा होऊ शकते, तर काही प्रकरणांत दहा लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या व्यवसायातील प्रत्येक घटकाने नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे.