मुंबई : गणेश चतुर्थीला वाजतगाजत आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. नेहमीप्रमाणे यंदाही गणेशोत्सावाचा उत्साह महाराष्ट्रासह देशभरात पाहायला मिळत आहे. 14 सप्टेंबर रोजी घरोघरी गणपती विराजमान झाले. मात्र मंगळवारी, 15 सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. तर आज, शुक्रवार, 18 सप्टेंबर रोजी पाच दिवसांच्या गणरायाचा विसर्जन सोहळा पार पडणार आहे. प्रामुख्याने घरगुती गणपतींचा दीड दिवसांच्या विसर्जन सोहळ्यात समावेश असतो. मात्र पाच दिवसांच्या गणपती विसर्जनात घरगुतीसह काही सार्वजनिक मंडळांच्या गणरायांचेही विसर्जन केले जाते. गणेशोत्सवात 10 दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची भाविक मनोभावे पूजा आणि सेवा करतात. त्यानंतर गणपती विसर्जनाद्वारे बाप्पाला निरोप देण्यात येतो. कोणाकडे दीड दिवस, कोणाकडे 5 दिवस, तर कोणाकडे 10 दिवस गणपती विराजमान होतात. आज पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होणार असून जाणून घेऊया विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि योग्य पद्धत.
हेही वाचा : Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात आज हवामानाचा लपंडाव! कुठे पाऊस तर कुठे ढगाळ वातावरण, जाणून घ्या हवामानाचा अंदाज
आजच्या पाचव्या दिवशीचा गणेश विसर्जनाचा मुहूर्त हा सकाळी 6.27 ते 11.01, दुपारी 12.32 ते 2.04 आणि संध्याकाळी 5.07 ते 6.38 असा असणार आहे. विसर्जनावेळी सामान्यतः गणपतीला पूजा, हवन इत्यादी पूर्ण विधींनी निरोप दिला जातो. परंतु जर हे शक्य नसेल, तर तुम्ही या सोप्या विधीने बाप्पाला निरोप देऊ शकता. हे करण्यासाठी विसर्जनापूर्वी गणपतीची पूजा करून त्यांना दुर्वा, फळे, फुले, मोदक, लाडू इत्यादी अर्पण केले जाते. अगरबत्ती लावून आरती करून आपल्या चुकांबद्दल क्षमा मागितली जाते. मग, 'गणपती बाप्पा मोरिया, पुढच्या वर्षी लवकर या!' असा जयघोष करत, गणपतीची मूर्ती आदराने उचलून विसर्जनस्थळी घेऊन जातात. विसर्जनापूर्वी आपल्या कुटुंबासोबत गणपतीची पुन्हा एकदा आरती होते. सुख-समृद्धी आणि सर्व संकटांपासून संरक्षणासाठी प्रार्थना केली जाते. भावपूर्ण निरोप देत बाप्पाचे विसर्जन होते.