श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवानंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा दहीहंडी 5 सप्टेंबरला आली आहे. महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई आणि ठाण्यात, दहीहंडी उत्सवाला मोठे महत्त्व आहे. विविध ठिकाणी आकर्षक सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि दहीहंडी स्पर्धांचे आयोजन केले जाते. मुंबईमध्ये दहीहंडीचा थरार पाहायला रस्त्यावर लोकांची गर्दी पाहायला मिळते. यामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम होताना पाहायला मिळतो. या निमित्ताने मुंबईत वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे.
गोविंदा पथकांची गर्दी, दहीहंडीचे कार्यक्रम आणि सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई वाहतूक पोलिसांकडून शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर वाहतूक बंद किंवा वळविण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. काही मार्गांवर वाहनांना प्रवेश बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दहीहंडीच्या ठिकाणी गर्दी वाढल्यास वाहतूक कोंडी होऊ नये आणि नागरिकांची सुरक्षितता राखली जावी, यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
यावेळी ठाण्यात सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत टेंभी नाका, टॉवर नाका, संकल्प चौक, वागळे इस्टेट आणि बाळकुम, काशिनाथ घाणेकर यांसारख्या प्रमुख ठिकाणी वाहतुकीत बदल केले आहेत. दहीहंडीनिमित्त गर्दीच्या अनुशंगाने या ठिकाणचे काही मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
तसेच मुंबईतील एस. व्ही. रोडवरून दक्षिणेकडून हिल रोडच्या दिशेने जरीमरी रोडमार्गे जाणाऱ्या वाहनांना याठिकाणी प्रवेश बंदी असेल. या वाहनांना विठ्ठल मंदिर सिग्नल येथून यू-टर्न घ्यावा लागेल. त्यानंतर या वाहनांना एस. व्ही. रोडनं उत्तरेकडे जाऊन डॉ. व्ही. रघुनाथ मार्ग, सेंट मार्टिन रोड आणि पुढे हिल रोडचा वापर करता येईल. यावेळी जरीमरी रोडवर दहीहंडीचा कार्यक्रम होणार असल्यामुळे शनिवारी सायंकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत जरीमरी रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.