मुंबई, ११ मे २०२३, प्रतिनिधी : राज्याच्या सत्तासंघर्षावर गुरुवारी निकाल लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहा १६ आमदारांच्या अपात्रतेसह सत्तासंघर्षावर गुरुवारी निकाल लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापीठ याप्रकरणी सुनावणी देणार असून सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे भवितव्य ठरणार आहे.
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मविआ सरकार कोसळले. आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्याआधी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यानी शिंदेंसह त्यांच्यासोबत गेलेल्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. मात्र, या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यांच्या खंडपीठाने हंगामी स्थगिती दिली होती. तर, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केले व राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. या सर्व प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे हंगामी आदेश, शिवसेनेतील फूट, आमदारांची अपात्रता, राज्यपालांची भूमिका आदी विविधांगी सखोल चर्चा करण्यासाठी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांच्या घटनापीठाची स्थापना करण्यात आली. न्या. हिमा कोहली, न्या. एम. आर. शहा, न्या. पी. एस. नरसिंहा आणि न्या. कृष्ण मुरारी यांचा या घटनापीठात समावेश होता. दरम्यान, या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी सुनावणी होणार असून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सर्वांचे लक्ष लागले आहे.