ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतलेला पाऊस आता सप्टेंबरमध्ये धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये पुढील दोन दिवस वादळी वारे आणि मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवली आहे. तर काही जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
सप्टेंबर महिना सुरू होऊन एक आठवडा उलटला तरी राज्यातील अनेक भागांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला पाहायला मिळत नाही. मात्र, आता हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, राज्यातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. यावेळी कोकणात, विदर्भात आणि घाटमाथा परिसरात मान्सूनचा मुक्काम अधिक काळ लांबण्याचे स्पष्ट संकेत आहेत. तर उर्वरित भागांमध्ये हलका ते मध्यम, तसेच जोरदार पावसाची शक्यता आहे.
यावेळी मुंबईसह पालघर, ठाणे, पनवेल आणि कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. कोकण विभागात 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून, हलक्या पावसाच्या सरी पडताना पाहायला मिळत आहेत.
तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक घाट, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या चार जिल्ह्यांत हलका ते मध्यम, तसेच मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या भागात 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, येथे देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत अनेक दिवसांनंतर चांगल्या पावसाच्या सरींचे संकेत मिळत आहेत. मात्र तरी देखील या भागांत सध्या कोणताही अलर्ट नाही. या भागातील हवामानातही बदल होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका, मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा होण्याची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांना विजांचा कडकडाट आणि वादळी वारे होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.