नवनाथ बोरकर, प्रतिनिधी
बारामती : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर सध्या एका चिमुकल्या आवाजाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. हा आवाज आहे शुभम वाघरी या विद्यार्थ्याचा. जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांना, विशेषतः नवविवाहित जोडप्यांना आपल्या खास आवाजात शुभेच्छा देणारा शुभम सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी भाविकांचीही गर्दी होताना पाहायला मिळत आहे.
शुभम हा चौथीच्या इयत्तेत शाळेत शिक्षण घेतो. मात्र शाळा सुटल्यानंतर तो जेजुरी गडावर येतो आणि आपल्या आवाजाच्या माध्यमातून भाविकांचे मनोरंजन करत सेवा बजावतो. त्याच्या बोलण्यातील खास शैली आणि आवाजामुळे काही भाविकांनी त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. पाहता पाहता शुभम सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
मात्र, या व्हायरल चेहऱ्यामागची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शुभम आणि त्याचे आई – वडील एका दहा बाय दहाच्या पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. शुभमचे आई-वडील सेंट्रींगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही शुभम शिक्षण घेत आहे आणि मिळेल त्या वेळेत जेजुरी गडावर जाऊन सेवा करत आहे. त्यातून भाविक दानधर्म करतात. त्यातील काही मदत त्याला मिळते. त्याच मदतीवर तो चिमुकला शुभम आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहे. एका बाजूला सोशल मीडियावर शुभमच्या आवाजाची चर्चा होत असताना, दुसऱ्या बाजूला त्याच्या शिक्षणाला आणि भविष्यातील स्वप्नांना आर्थिक मदतीची गरज आहे. यासंबंधी शुभम आणि त्याच्या आईने जय महाराष्ट्र चॅनेलच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले आहे.
शुभमच्या या गुणाला योग्य दिशा आणि त्याच्या शिक्षणाला आर्थिक पाठबळ मिळालं, तर हा मुलगा भविष्यात नक्कीच मोठी मजल मारू शकतो. त्यामुळे सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती आणि सेवाभावी मंडळींनी शुभमच्या कुटुंबाच्या परिस्थितीची दखल घेत त्याच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. जेजुरीच्या गडावर आवाजाने भाविकांची मने जिंकणाऱ्या या शुभमला आता आपल्या समाजाच्या मदतीची आणि आशीर्वादाची गरज आहे.