धुळे : साक्री तालुक्यातील शेंदवड परिसरातील शिवाऱ्या डोंगर परिसरात 18 वर्षीय तरुणी आणि 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह एकाच ठिकाणी आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रात्री कुटुंबीयांसोबत जेवण झाल्यानंतर तरुणी घरात झोपली होती. सकाळी ती घरात दिसून न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. त्याचदरम्यान तरुणाने एका व्यक्तीला मध्यरात्री संदेश पाठविल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी शिवाऱ्या डोंगर परिसरात शोध घेतला असता दोघेही गंभीर अवस्थेत आढळून आले. ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पिंपळनेर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोघांना ग्रामीण रुग्णालय, पिंपळनेर येथे नेण्यात आले. डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. घटनास्थळाचा पंचनामा, संबंधित व्यक्तींचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली जाणार आहे.