Thane Heat Wave: उकाड्याने ठाणेकर हैराण; मार्चच्या सुरुवातीलाच तापमान 40 अंशांवर ,हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

ठाणे शहरात मार्चच्या सुरुवातीलाच उष्णतेचा तडाखा वाढला असून तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे

Thane Heat Wave: उकाड्याने ठाणेकर हैराण; मार्चच्या सुरुवातीलाच तापमान 40 अंशांवर ,हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Thane Heat Wave: मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच ठाणे शहरात उन्हाचा तडाखा तीव्र होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून मंगळवारी शहरातील कमाल तापमानाने तब्बल ४० अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. त्यामुळे दुपारच्या वेळेत बाहेर पडणे नागरिकांसाठी कठीण होत असून उकाड्यामुळे ठाणेकर हैराण झाले आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

पहाटेच्या सुमारास हवेत थोडासा गारवा जाणवत असला तरी सकाळीच उन्हाची तीव्रता वाढू लागते. दुपारपर्यंत सूर्यकिरणांचा चटका इतका वाढतो की रस्त्यांवरची वर्दळही काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एरवी ठाणे शहरात मार्च महिन्यात कमाल तापमान साधारण ३४ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित असते. मात्र यंदा तापमानात चार ते पाच अंशांनी वाढ झाल्यामुळे उष्णतेची झळ अधिक तीव्रपणे जाणवत आहे.

हेही वाचा: Dombivli News: कल्याण डोंबिवली परिसरात पालिकेची मोठी कारवाई; 'शोरमा गर्ल' एकता सावंतची गाडी उचलली

सध्या शहरातील कमाल तापमान ३८ ते ४० अंशांच्या दरम्यान नोंदवले जात आहे, तर किमान तापमानही २५ ते २६ अंशांदरम्यान असल्याने रात्रीही उकाड्याचा त्रास जाणवत आहे. दिवसभर उष्णता कायम राहिल्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामांदरम्यानही त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी ही परिस्थिती अधिक त्रासदायक ठरत आहे.

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर जाणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे. जर बाहेर पडणे आवश्यक असेल, तर डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगल्स, डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा, असा सल्ला दिला जात आहे.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: महाराष्ट्र तापला; विदर्भ होरपळला, राज्यावर 'उष्णतेच्या लाटेचे' सावट

तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे दिवसातून वारंवार पाणी पिणे, तसेच लिंबूपाणी, ताक, लस्सी किंवा ओआरएससारख्या पेयांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. हलके आणि सूती कपडे वापरणेही शरीराला उष्णतेपासून काही प्रमाणात संरक्षण देऊ शकते.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वाढत्या तापमानामुळे यंदाचा उन्हाळा ठाणेकरांसाठी अधिक कडक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number