निलंबित PSI रणजीत कासलेला बीड पोलिसांनी घेतलं ताब्यात

अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात फरार असलेल्या कासलेला आज पहाटे बीड पोलिसांनी पुण्यात स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलं.

निलंबित PSI रणजीत कासलेला बीड पोलिसांनी घेतलं ताब्यात

बीड: बीड सायबर पोलिस ठाण्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले अखेर बीड पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात फरार असलेल्या कासलेला आज पहाटे बीड पोलिसांनी पुण्यात स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलं. काही तासांपूर्वीच त्याने पुणे विमानतळावर पत्रकार परिषद घेऊन आपण लवकरच शरण येणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र त्याआधीच बीड पोलिसांनी धाडसी कारवाई करत त्याला अटक केली. अटक केल्यानंतर त्याला बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर करण्यात आलं असून, लवकरच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेलं जाणार आहे.

रणजीत कासलेने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकामागोमाग एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्यावर अन्याय होत असल्याचा दावा केला होता. त्याने पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांवरही थेट आरोप करत खळबळ माजवली होती. विशेष म्हणजे, त्याने वाल्मीक कराड या आरोपीच्या एन्काउंटरसाठी आपल्याला विचारणा झाल्याचा दावाही केला. अशा प्रकारच्या गंभीर विधानांमुळे कासले सातत्याने चर्चेत राहिला. याच व्हिडीओंपैकी एका व्हिडीओत त्याने एका समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कासलेविरोधातील वादांचा सिलसिला नवा नाही. तो सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत असताना एका आरोपीला परवानगीशिवाय गुजरातला घेऊन गेला होता आणि त्यानंतर पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. याची चौकशी करून पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी 26 मार्च रोजी त्याला निलंबित केले होते. निलंबनानंतर त्याने अधिक आक्रमक भूमिका घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिस आणि नेत्यांवर टीका सुरू ठेवली होती.

दरम्यान, अटक होण्यापूर्वी कासलेने पुन्हा एकदा दावा केला होता की, त्याच्याकडे सर्व पुरावे आहेत आणि वेळ आल्यावर तो ते सादर करेल. त्याने पत्रकार परिषदेतही पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करत आपण आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं. मात्र बीड पोलिसांनी कोणताही धोका न पत्करता त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी जिल्ह्यात आणलं आहे. आता या प्रकरणात काय नवीन खुलासे समोर येतात आणि कासलेच्या आरोपांची चौकशी कुठपर्यंत जाते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number