Solapur Crime: सोलापुरात माजी नगरसेवकावर भरदिवसा कोयत्याने हल्ला; 50-60 जणांसमोर थरार, CCTV फुटेज समोर

सोलापुरात माजी नगरसेवक लालचंद वाधवानी यांच्यावर भरदिवसा धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. 50 ते 60 जणांसमोर झालेला प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Solapur Crime: सोलापुरात माजी नगरसेवकावर भरदिवसा कोयत्याने हल्ला; 50-60 जणांसमोर थरार, CCTV फुटेज समोर

सोलापूर : शहरात माजी नगरसेवकावर भरदिवसा झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. लालचंद वाधवानी यांच्यावर एका व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे परिसरात नागरिकांची वर्दळ असताना हा प्रकार घडला. हल्ल्याची दृश्ये जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लालचंद वाधवानी हे सिंधी समाजाचे अध्यक्ष असून यापूर्वी त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले आहे. घटनेच्या वेळी ते परिसरात असताना हल्लेखोराने अचानक त्यांच्यावर शस्त्राने वार केले. काही क्षणांत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.

हल्ल्यानंतर संशयित व्यक्ती घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तो दुचाकीवरून निघून गेला. मात्र, त्याची दुचाकी सुरू न झाल्याने काही वेळ त्याला वाहन ढकलत न्यावे लागल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याची माहिती आहे. हल्लेखोराने जुन्या मॉडेलच्या हिरो होंडा दुचाकीचा वापर केल्याचेही सांगितले जात आहे.

या घटनेनंतर जखमी लालचंद वाधवानी यांना तातडीने उपचारासाठी सोलापुरातील आसरा चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय माहिती समोर येणे बाकी आहे.

दरम्यान, हल्लेखोराचे वय तुलनेने अधिक असल्याचे सीसीटीव्ही चित्रणावरून दिसून येत असल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात उपस्थित असलेल्या अनेक नागरिकांसमोर हा हल्ला झाला. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यामागे पूर्ववैमनस्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, पूर्वीचा संघर्ष किंवा अन्य कारणातून हा प्रकार घडला आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयिताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच घटनास्थळावरील माहिती आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळणाऱ्या माहितीदेखील पोलिसांकडून पडताळली जात आहे.

या घटनेनंतर माजी नगरसेवक अरुण भालेराव यांनी हल्लेखोराविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेऊन हल्ल्यामागील नेमके कारण समोर आणावे, अशी मागणी होत आहे.

सोलापूर शहरात अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटनांवरून चिंता व्यक्त होत असतानाच माजी लोकप्रतिनिधीवर सार्वजनिक ठिकाणी झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. सध्या पोलिसांकडून फरार संशयिताचा शोध सुरू असून, तपासातून या घटनेमागील संपूर्ण कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number