पुणे : आपला होणारा पती केतन अग्रवाल याची कथित हत्या करण्याच्या काही आठवड्यांपूर्वी, हत्येतील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची एका कॅफेमध्ये रात्री उशिरा भेट झाली होती. या भेटीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फेब्रुवारीमध्ये साखरपुडा होऊनही सिया आणि चेतन यांचे प्रेमसंबंध कायम होते, असा केतनच्या कुटुंबीयांचा आरोप या व्हिडिओमुळे अधिक बळकट होण्याची शक्यता आहे. 23 मे रोजी रात्री साडे-नऊच्या सुमारास चित्रित झालेल्या या व्हिडिओमध्ये सिया आणि चेतन आनंदी दिसत होते. तिने त्याचे हात धरून ते आपल्या खांद्याभोवती घेतले आणि मिठी मारल्याचे यात दिसून येत आहे. या व्हिडिओची सत्यता आणि सुसंगतता तपासली जात आहे. तो तपासामध्ये एक महत्त्वपूर्ण दुवा ठरेल, असे समजते.
सियाच्या पालकांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, चेतनसोबत तिचे कोणतेही प्रेमसंबंध नव्हते. ते केवळ मित्र होते. "केतनसोबत साखरपुडा झाल्यानंतर, तिने केतनला टाळल्याचे, त्याच्याशी न बोलल्याचे किंवा दोघांनी ठरवलेल्या योजनांकडे दुर्लक्ष केल्याचे माझ्या कधीच निदर्शनास आले नाही. जर तिचे चेतनसोबत काही असते, तर तशी लक्षणे नक्कीच दिसून आली असती. गेल्या चार महिन्यांत मला अशी कोणतीही लक्षणे दिसली नाहीत," असे सियाची आई पूजा गोयल यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावर सिया आणि चेतन यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ आधीच व्हायरल आहेत. अशाच एका फोटोबद्दल विचारलेल्या प्रश्नावर पूजा यांनी सांगितले की, ते दोघे एका मित्राच्या लग्नाला गेले होते. "मला सर्वांना सांगायचे आहे की, जर माझी मुलगी दोषी असेल, तर या प्रकरणाची लवकरात लवकर जलद गतीने सुनावणी व्हावी आणि तिला फाशी दिली जावी," असे पूजा म्हणाली. केतनचे वडील विशाल देवीचंद अग्रवाल यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये (FIR) असा आरोप करण्यात आला आहे की, चेतन आणि सिया या दोघांनी मिळून केतनला कड्यावरून खाली ढकलले. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. 18 जूनच्या सकाळी केतन घरातून बाहेर पडला. पुणे-मुंबई महामार्गावरील किवळे पुलावरून सियाला सोबत घेतले आणि त्यानंतर तो किल्ल्याकडे निघाला. सकाळी 10.45 च्या सुमारास सियाने आपल्या होणाऱ्या पतीच्या (केतनच्या) आईला फोन करून सांगितले की, लोहगड किल्ल्यावर तो चुकून दरीत पडला आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्याला दरीत शोधून काढले आणि रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.