मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे जेवण बनवताना झालेल्या अपघातात एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सचिन रसाळ असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असल्याची माहिती आहे. पाच दिवसांपूर्वी मंदिरातील स्वयंपाकघरात ही दुर्घटना घडली होती. या घटनेत रसाळ हे सुमारे ६० टक्के भाजले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धिविनायक मंदिरात जेवण बनवण्याचे काम सुरू असताना उकळलेल्या पाण्याचा टोप अचानक सचिन रसाळ यांच्या अंगावर पडला. त्यामुळे त्यांच्या शरीराचा मोठा भाग भाजला. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान मृत्यू
सचिन रसाळ यांच्यावर गेल्या पाच दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान काल त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मंदिर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दादर पोलीस ठाण्यात नोंद
या दुर्दैवी घटनेची नोंद दादर पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची नोंद घेऊन पुढील कार्यवाही केली जात आहे. घटना नेमकी कशी घडली, याबाबत अधिक तपशील तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.