Patoli Recipe: नागपंचमीच्या नैवेद्यासाठी खास पातोळ्या! शुभ्र पातळ आवरण अन् खमंग गोड सारणाची लज्जतदार रेसिपी, जाणून घ्या

श्रावण महिना सुरू झाला की घराघरात सण-उत्सवांची तयारी सुरू होते.

Patoli Recipe: नागपंचमीच्या नैवेद्यासाठी खास पातोळ्या! शुभ्र पातळ आवरण अन् खमंग गोड सारणाची लज्जतदार रेसिपी, जाणून घ्या

Patoli Recipe: श्रावण महिना सुरू झाला की घराघरात सण-उत्सवांची तयारी सुरू होते. नागपंचमी, श्रावणी सोमवार अशा दिवसांसाठी नैवेद्याला काय बनवायचे, याचीही लगबग असते. अशावेळी कोकणातील लोकप्रिय पातोळ्या हा उत्तम पर्याय ठरू शकतो. नेहमीच्या पद्धतीपेक्षा थोडी वेगळी रेसिपी करून पातोळ्यांना अधिक मऊ, सुगंधी आणि चवदार बनवता येते.

या पातोळ्यांची खासियत म्हणजे त्यासाठी तयार केली जाणारी उकड. पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यामुळे उकडीला छान मऊपणा येतो आणि तयार झालेल्या पातोळ्यांचा रंगही शुभ्र दिसतो. त्यामध्ये नारळ, गूळ, खवा, खसखस आणि ड्रायफ्रूटचे स्वादिष्ट सारण भरल्यामुळे प्रत्येक घासाला वेगळीच चव मिळते.

सारणासाठी लागणारे साहित्य

  • 1 वाटी ताजे ओले खोबरे

  • अर्धी वाटी गूळ

  • 2 चमचे साजूक तूप

  • 2 चमचे खवा

  • 2 चमचे खसखस

  • आवडीनुसार काजू, बदाम, मनुका किंवा इतर ड्रायफ्रूट

खवा नसेल तर त्याऐवजी मिल्क पावडर वापरता येईल.

उकडीसाठी साहित्य

  • 1 वाटी तांदळाचे पीठ

  • 1 वाटी दूध

  • 1 चमचा साजूक तूप

  • चिमूटभर मीठ

  • हळदीची पाने

पातोळ्या बनवण्याची कृती

सुरुवातीला कढईत तूप गरम करून त्यात चिरलेले काजू, बदाम आणि मनुका हलके भाजून घ्या. त्यानंतर त्यात ओले खोबरे घालून काही मिनिटे परता. खोबऱ्यातील अतिरिक्त ओलावा कमी झाल्यावर गूळ घालून मिश्रण एकजीव करा.

गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर खवा आणि भाजलेली खसखस घाला. सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. तयार सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

आता दुसऱ्या भांड्यात दूध, तूप आणि चिमूटभर मीठ गरम करा. दूध उकळीला आल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ घालून झटपट ढवळा. मिश्रण एकत्र आल्यावर झाकण ठेवून काही वेळ वाफ येऊ द्या. नंतर ही उकड थोडी कोमट असतानाच मळून मऊ गोळा तयार करा.

हळदीची पाने स्वच्छ करून त्यांना थोडे तूप लावा. त्यावर उकडीचा पातळ थर पसरवा आणि मध्यभागी तयार केलेले नारळ-गुळाचे सारण ठेवा. पान दुमडून पातोळी तयार करा. सर्व पातोळ्या तयार झाल्यानंतर त्या वाफवून घ्या.

साधारण 10 ते 15 मिनिटांत पातोळ्या छान शिजतील. गरमागरम पातोळ्यांवर थोडे साजूक तूप घालून सर्व्ह करा. श्रावणातील नैवेद्यासाठी तसेच घरच्या मंडळींसाठी हा पारंपरिक पदार्थ नक्कीच खास ठरेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number