मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सहा खासदार, विधान परिषदेचे एक आमदार, तर राज्यातील काही पदाधिकारी यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील खासदारदेखील महायुतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आगामी काळात भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी होणार असल्याच्या चर्चा राज्यासह देशातील राजकारणात रंगू लागल्या आहेत. या हातमिळवणीवर पक्षांतर्गत अत्यंत गुप्त पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली जात आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दाैऱ्यावर असून एका कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या या दिल्ली दाैऱ्याला महत्वाचे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या वारवांर दिल्लीमध्ये भेट होत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा महाराष्ट्रात वर्चस्व टिकवून ठेवण्याची महत्त्वाचं पाऊल म्हणून याकडे पाहिले जात आहे.
दरम्यान, मुसद्दी राजकारणी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या संभाव्य राजकीय समीकरणाची चाचपणी करण्याची जबाबदारी पक्षाच्या एका अत्यंत ज्येष्ठ नेत्यावर सोपवल्याचे समजते. सध्या शरद पवार गटाकडे १० आमदार आणि ८ खासदार असे संख्याबळ आहेत. केंद्रातील आणि राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, एनडीएला थेट सत्तेत सामील होऊन पाठिंबा द्यावा की बाहेरून मदत करावी, या दोन्ही पर्यायांवर पक्षांतर्गत चाचपणी सुरू आहे. या बड्या नेत्याने पक्षाच्या सर्व खासदार आणि आमदारांशी संपर्क साधून त्यांची मते जाणून घेण्यास सुरुवात केल्याचे समजते.
या संभाव्य युतीवर आघाडीचे घटक पक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत सूचक वक्तव्य केले आहे. पावसाळी अधिवेशनात याबाबत वडेट्टीवार म्हणाले की, “या विषयावर चर्चा १०० टक्के सुरू आहे. आता पाहावे हे लागेल की ते (पवार गट) विचारधारा सोडून सत्तेत जातात की विचारधारेची कास धरून काँग्रेससोबत राहतात. शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. जोपर्यंत त्यांच्याकडून आमच्याकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत आम्ही कसे ठरवणार? मात्र, त्यांच्या पक्षातील मोठ्या नेत्याने जर आम्हाला तसे संकेत दिले, तर आम्ही त्यांना आमच्यासोबतच राहण्यासाठी नक्कीच विनंती करू.” वडेट्टीवार यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे संकेत नाकारता येत नाहीत.