गणेशोस्तवाला अवघे 2 दिवस बाकी कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावेळी चाकरमानी आणि गणेशभक्त कोकणात जात असतात. दरम्यान यंदाही मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीने आता उग्र रूप धारण केले आहे. रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून कोकणात जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. दरवर्षी प्रमाणे माणगाव आणि इंदापूर जवळ ही वाहतूक कोंडी झाली आहे. साधारण 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
वाहतूक कोंडीला कोकणात निघालेले गणेशभक्त वैतागले असून गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या कोकण वासियांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या होत असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच याच महत्त्वाचं कारण म्हणजे बेशिस्त वाहन चालक. त्यांचा फटका कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना बसतो आहे. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांनी दोन्ही मार्गांवरून वाहने चालवण्यास सुरुवात केल्याने दोन्ही लेन वर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. यावेळी महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात असून वाहतूक सुरळीत करण्याचे पोलिसांचे प्रयत्न आहेत.
तर दुसरीकडे नागोठणे येथे मुंबई गोवा महामार्गावर बांधलेल्या पुलाचा माती भरवा खचल्याने रस्त्याला तडे गेले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या सुरक्षितेवर लक्ष ठेऊन हलक्या वाहनांची वाहतुक करण्याचा प्रशासनाचा निर्णय घेण्यात आला आहे. नागोठणे पुलाजवळील सर्व्हिस रोड चांगला नसल्याने सकाळ पासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहनांच्या रांगा, प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी धोकादायक पुलावरून हलक्या वाहनांची वाहतुक सुरु आहे.
तसेच मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. महामार्गावर वाहनांचा वेग मंदावल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. शांग्रीला जवळ समृद्धी महामार्ग इंटरचेंजजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दृष्य आहे. तर वाहतूक कोंडीत छोटे-मोठे अनेक वाहने अडकली असून वाहनचालक आणि प्रवाशांना मनस्ताप होत आहे. गणपती उत्सवासाठी घरी जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे.