मुंबई : वरिष्ठ पत्रकार, लेखक आणि 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीचे सिनिअर प्रोड्युसर प्रसाद घाणेकर यांचं आज, 8 सप्टेंबर 2026 रोजी दुखःद निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जय महाराष्ट्रच्या आऊटपुट विभागात कार्यरत असणारे प्रसाद घाणेकर यांना वृत्तलेखन आणि वृत्तपत्र निर्मितीतला दांडगा अनुभव होता. झी 24 तास, न्यूज18 मराठी, पुढारी या वृत्तवाहिन्यांमध्ये त्यांनी काम केलं होतं. राजकीय आणि सामाजिक विषय यात त्यांचा विशेष हतखंडा होता.
अतिशय हलाखीच्या परिस्थितीशी संघर्ष करत त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर ते उत्तरोत्तर प्रगती करत गेले. मनमिळाऊ स्वभाव, सतत दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती ही त्यांची ओळख होती. कामात किंवा एरवीसुद्धा कुणी मदत मागितल्यावर त्या व्यक्तीला कधीच 'नाही' म्हणायचं नाही, हा त्यांचा शिरस्ता होता.
वृत्तवाहिन्यांमध्ये निवडणुकीच्या काळात अधिक काम असतं. तेव्हा कार्यालयात सर्वात आधी पोहोचणाऱ्यांमध्ये घाणेकर असायचे. सदैव वेळेत येणे, अतिशय नीटनेटकं काम करणे, कामाच्या ठिकाणी आनंदी वातावरण ठेवणे, तरुण सहकाऱ्यांना मार्गदर्शन करणे, चूक दाखवताना सुद्धा समोरच्या व्यक्तीला तो अपमान वाटणार नाही, याची काळजी घेणे, असे त्यांचे किती तरी स्वभाव विशेष सांगता येतील.
घाणेकर मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील आडिवरे गावचे होते. तिथल्या सामाजिक आणि शैक्षणिक बाबींशी त्यांची नाळ सदैव जोडलेली होती. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुलं असं कुटुंब आहे. प्रसाद घाणेकर यांना जय महाराष्ट्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.