सिंधुदुर्ग: सावंतवाडी शहरात शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसर हादरला आहे. मोती तलावात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने उडी घेतल्यानंतर तिला वाचवण्यासाठी तिच्या नातेवाईकानेही पाण्यात उडी घेतली. मात्र, या बचावाच्या प्रयत्नात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे सावंतवाडी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लिसा गोसावी ही कारिवडे येथील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होती. शनिवारी सकाळची शाळा आटोपल्यानंतर ती आपल्या चुलत बहिणीसोबत सावंतवाडी येथे आली होती. याचदरम्यान वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील त्यांचा नातेवाईक रोहन गोसावी हा मुंबईहून त्यांना भेटण्यासाठी आला होता.
तिघेही सावंतवाडी मोती तलाव परिसरातील बापूसाहेब महाराज यांच्या पुतळ्याजवळ थांबले होते. यावेळी लिसा तलावाच्या दिशेने तोंड करून कठड्यावर बसली होती. काही वेळातच तिने अचानक तलावात उडी घेतली. हा प्रकार पाहून तिच्या चुलत बहिणीने रोहनला माहिती दिली.
लिसाला वाचवण्यासाठी रोहनने तातडीने तलावात उडी घेतली. मात्र, पाण्यात दोघेही बुडाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळाने रोहन पाण्यावर तरंगताना दिसून आला. नागरिकांनी त्याला बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, लिसा पाण्याखाली गेल्याने तिचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सह्याद्री ॲडव्हेंचर आंबोली-सांगेली रेस्क्यू टीमला पाचारण केले. पथकाने शोधमोहीम सुरू केल्यानंतर विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह बाहेर काढून पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी रुग्णालयात हलवण्यात आला.
या घटनेमुळे मोती तलाव परिसरात मोठी गर्दी झाली होती. लिसाने तलावात उडी का घेतली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाकडून घटनेची माहिती आणि संबंधित परिस्थितीची चौकशी केली जात आहे.
खवड्या डोंगराच्या घटनेचीही चर्चा
सावंतवाडीतील या घटनेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरील नुकतीच घडलेली हृदयद्रावक घटना पुन्हा चर्चेत आली आहे. खवड्या डोंगरावर कुणाल चांदगुडे या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली. मुलाला वाचवण्यासाठी पुढे गेलेले त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे यांचाही या घटनेत मृत्यू झाला. काही क्षणांत संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.