Samruddhi Expressway Accident: मुंबईहून अमरावतीकडे निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; समृद्धी महामार्गावर कार पुलाखाली कोसळली, दोघांचा दुर्दैवी अंत

समृद्धी महामार्गावर टायर फुटल्याने भरधाव कार सुरक्षा कठडा तोडून पुलाखाली कोसळली. या भीषण अपघातात महिला व अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

Samruddhi Expressway Accident: मुंबईहून अमरावतीकडे निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; समृद्धी महामार्गावर कार पुलाखाली कोसळली, दोघांचा दुर्दैवी अंत

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर रविवारी झालेल्या भीषण अपघातात एका महिला आणि अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात लासूर स्टेशनजवळील डोणगाव परिसरात घडला असून, टायर फुटल्यामुळे कारवरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून अमरावतीकडे एक कुटुंब कारने प्रवास करत होते. समृद्धी महामार्गावरील डोणगाव परिसरातील पुलाजवळ कार पोहोचली असताना अचानक वाहनाचे टायर फुटले. भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि वाहन थेट महामार्गाच्या सुरक्षा कठड्यावर आदळले.

धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की कारने सुरक्षा कठडा तोडला आणि सुमारे २० फूट खोल पुलाखाली कोसळली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी आणि महामार्गावरील इतर वाहनचालकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. या दुर्घटनेत कारमधील महिला आणि एका अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या अन्य पाच जणांना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा: Mumbai-Delhi Expressway: मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेवर भीषण दुर्घटना! एका चुकीमुळे तीन वाहनांची धडक, चार जणांचा जागीच मृत्यू

घटनेची माहिती मिळताच पोलिस, महामार्ग सुरक्षा पथक आणि आपत्कालीन मदत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. अपघातग्रस्त वाहन पुलाखालून बाहेर काढण्यासाठी विशेष यंत्रणांची मदत घेण्यात आली. काही काळ या परिसरात वाहतुकीवरही परिणाम झाला होता. प्राथमिक तपासात टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले असले तरी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. वाहनाचा वेग, तांत्रिक बिघाड किंवा इतर कारणे यांचाही शोध घेतला जात आहे.

तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर आणखी एक गंभीर अपघात घडला असून, खाजगी प्रवासी बस आणि ट्रकच्या धडकेत २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात मेहकर तालुक्यातील पिंपरी माळी गावाजवळ घडला. पुण्याहून नागपूरकडे जाणारी बाबा ट्रॅव्हल्सची खाजगी बस समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना समोर जात असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडकली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की बसचा पुढील भाग मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला.

हेही वाचा: IMD Alert: पुढील 24 तास सावध राहा! विजा, वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता; 26 जिल्ह्यांना यलो अलर्ट

अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक प्रवासी जखमी झाले असून काहीजण बसमध्ये अडकून पडल्याची माहिती मिळाली. जवळपास एक ते दीड तास बचावकार्य सुरू होते. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या दोघांवर विशेष वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

समृद्धी महामार्गावर यापूर्वीही अनेक गंभीर अपघात घडले असून, पुन्हा एकदा झालेल्या या दुर्घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number