कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. यावेळी त्याच्या कॉमेडीमुळे नव्हे, तर महाराष्ट्र सरकारच्या एका कार्यक्रमात झालेल्या सन्मानामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समयचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. या कार्यक्रमातील काही क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना, प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल यांनी या सन्मानावर आक्षेप घेतला आहे.
समय रैना हा स्टँडअप कॉमेडीच्या क्षेत्रातील लोकप्रिय नाव आहे. त्याच्या वेगळ्या शैलीमुळे त्याचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. मात्र, त्याच्या विनोदातील भाषेवर आणि आशयावर यापूर्वीही टीका झाली आहे. विशेषतः ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आक्षेपार्ह भाषा आणि कथित अश्लील मजकुरावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यक्रमात त्याचा सन्मान करण्यात आल्याने आता नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
याच मुद्द्यावर सुनील पाल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली. समय रैनाच्या सार्वजनिक प्रतिमेचा आणि त्याच्या काही कार्यक्रमांभोवती निर्माण झालेल्या वादांचा संदर्भ देत त्यांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला. ज्या कलाकाराच्या कार्यक्रमातील भाषेबद्दल यापूर्वी आक्षेप नोंदवले गेले आहेत, त्यालाच सरकारी पातळीवर सन्मान का दिला जातो, असा सवाल त्यांनी केला.
सुनील पाल यांच्या मते, अशा प्रकारच्या निर्णयामुळे नव्या पिढीतील कलाकारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. प्रसिद्ध होण्यासाठी वादग्रस्त भाषा किंवा वाद निर्माण करण्याचा मार्ग स्वीकारला, तरी शेवटी त्याला प्रतिष्ठेची पावती मिळू शकते, असा अर्थ तर निघणार नाही ना, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
आपल्या व्हिडीओमध्ये सुनील पाल यांनी या संपूर्ण परिस्थितीवर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. ते वारंवार ‘घोर कलयुग’ असा उल्लेख करताना दिसले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून, काहींनी कलाकाराच्या वैयक्तिक विनोदी शैलीचा आणि सरकारी सन्मानाचा संबंध जोडणे योग्य नसल्याचे मत मांडले आहे.
दरम्यान, समय रैनाच्या कार्यक्रमातील उपस्थिती आणि त्याचा सन्मान यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. एका बाजूला समयची लोकप्रियता आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या कॉमेडीवर होणारी टीका, यामुळे त्याच्याभोवतीची चर्चा कायम असल्याचे दिसते.
आता सुनील पाल यांच्या टीकेनंतर या प्रकरणावर सरकारकडून किंवा समय रैनाकडून काही प्रतिक्रिया येते का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.