धुळे : साक्री तालुक्यातील वाकी गावाच्या शिवारात एका महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सुनंदा गोटू चौधरी (वय ४०) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणात पिंपळनेर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या दोन तासांत तिचा पती गोटू गनसाराम चौधरी (वय ४६) याला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
वाकी गावाच्या शिवारात महिलेचा मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, वाकी गावाच्या शिवारात सुनंदा चौधरी यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. दगडाने वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संशयिताचा शोध घेण्यासाठी तपासाला वेग देण्यात आला.
दोन तासांत संशयित पती ताब्यात
हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. प्राथमिक तपासाच्या आधारे मृत महिलेचा पती गोटू चौधरी याच्यावर संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान संशयिताने हत्येची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.