परभणी : परभणी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी दुर्घटना समोर आली आहे. मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिराचा सभामंडप अचानक कोसळल्याची दुर्दैवी घटना आज, शनिवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. या ढिगाऱ्याखाली जवळपास 30 ते 40 भाविक दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात असून आतापर्यंत 5 जणांच्या मृत्यूची बातमी समोर येत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. तर जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, परभणीचे खासदार संजय जाधव यांनी फेसबुकवर व्हिडीओ जारी केला असून त्यांनी घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “परभणी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र यशवाडी संस्थान येथे बांधकाम सुरू असलेल्या सभामंडपाचे पिलर कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. शनिवारनिमित्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांमध्ये या दुर्घटनेत सुमारे 30 ते 40 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी भाविकांना तातडीने योग्य उपचार मिळावेत आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत, ही ईश्वरचरणी प्रार्थना. प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य राबवून जखमींना सर्वतोपरी सहकार्य करावे. जिल्हाधिकारी तसेच सिव्हिल सर्जन यांच्याशी संवाद साधून मी घटनेचा आढावा घेतला असून तात्काळ मदतकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासन आणि आमचे सर्व पदाधिकारी घटनास्थळी व रुग्णालयात मदतीसाठी सज्ज आहेत,” अशी माहिती खासदार संजय जाधव यांनी दिली आहे.