Vladimir Putin backs India : रशियाकडून इंधन आयात करू नये, यासाठी अमेरिका भारतावर आयातशुल्क (टॅरिफ) आणि H-1B व्हिसा शुल्कवाढीच्या माध्यमातून व्यापार दबाव टाकत असतानाच, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेला मोठा इशारा दिला आहे. दक्षिण रशियातील सोची येथील आंतरराष्ट्रीय वाल्दाई चर्चासत्रात बोलताना पुतिन यांनी भारताला पूर्ण पाठिंबा दर्शवला. येथे दक्षिण रशियाच्या सोची येथील ब्लॅक सी रिसॉर्टमध्ये 140 हून अधिक देशांच्या सुरक्षा आणि भू-राजकीय विश्लेषकांच्या सोबतची चर्चा होती.
पुतिन यांचा अमेरिकेला थेट इशारा
पुतिन म्हणाले की, भारताने कोणत्याही बाह्य दबावाला बळी न पडू नये आणि स्वतःचा अपमान करून घेऊ नये. त्यांनी अमेरिकेला इशारा दिला की, "रशियाच्या व्यापारी मित्रांवर जर अमेरिकेने आयातशुल्क लादले, तर आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती भडकतील आणि अमेरिकेला व्याजदर उच्च ठेवावा लागेल. यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावेल."
मोदींवर विश्वास: पुतिन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी स्वतः ओळखतो. बाह्य दबावाला बळी पडून ते कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीत. भारताच्या सार्वभौम राष्ट्राची प्रतिष्ठा राखली जाईल.
भारताचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान टळेल
रशियाकडून होणारी तेल खरेदी भारतासाठी किती महत्त्वाची आहे, हे पुतिन यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, "भारताने जर रशियाकडून होणारी इंधन आयात थांबवली, तर भारताला 9 ते 10 अब्ज डॉलर्सचे (सुमारे 900 ते 1000 कोटी डॉलर्सचे) मोठे नुकसान सहन करावे लागेल."
भारतातील राजकीय नेते काय निर्णय घेतात, याकडे त्यांच्या देशातील लोकांचे बारकाईने लक्ष असते आणि कुणासमोरही आपला अपमान व्हावा, असे तेथील जनतेला मुळीच आवडत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
रशिया भारतासोबतच्या व्यापारातील असमानता कमी करण्याचा प्रयत्न करणार
अमेरिकेने टॅरिफ लादून दंडात्मक कारवाई केल्यामुळे भारताचे जे नुकसान होत आहे, ते रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीद्वारे संतुलित केले जाईल. तसेच व्यापार असमतोल दूर करण्यासाठी रशिया भारताकडून अधिक प्रमाणात कृषी उत्पादने आणि औषधे खरेदी करू शकतो, असे संकेतही पुतिन यांनी यावेळी दिले.
पुतिन यांनी डिसेंबर महिन्यात भारताचा दौरा करणार असल्याचेही सुतोवाच यावेळी केले. भारताबरोबर आमचे चांगले संबंध असून यामध्ये कोणतीही अडचण किंवा तणाव नाही, असेही पुतिन यावेळी म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.