पुणे : कोथरूड परिसरातील विकासकामांबाबत यूट्यूबवरून प्रश्न उपस्थित करताना आक्षेपार्ह आणि अश्लील स्वरूपाची शेरेबाजी केल्याच्या आरोपावरून पुण्यातील यूट्युबर संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. 3 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे सुमारे 1 वाजता पोलिसांचे पथक पंडित राहत असलेल्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतले. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील तसेच मिताली साळवेकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर व व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी संतोष पंडित यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सारिका कांबळे यांनी ही तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार ‘संतोष पंडित 6278’ या यूट्यूब अकाउंटवरून चंद्रकांत पाटील आणि मिताली साळवेकर यांच्याविषयी आक्षेपार्ह स्वरूपाचा मजकूर तसेच व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित पोस्ट आणि व्हिडिओमुळे बदनामी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच या पोस्टला मोठ्या प्रमाणावर व्ह्यूज मिळाल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे.
या तक्रारीच्या आधारे कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0361/2026 नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम 75 (1)(iv), 75(3), 356(2), 352 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 67 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे 1 वाजून 28 मिनिटांनी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, यूट्यूबवरील व्हिडिओच्या माध्यमातून कोथरूडमधील विकासकामांवर प्रश्न उपस्थित करताना पंडित यांनी अश्लील शेरेबाजी केल्याचाही आरोप आहे.