Pune Water Supply: पुणेकरांना मोठा दिलासा! पाणीकपातीवर महापालिकेचा यू-टर्न; ‘या’ तारखेपर्यंत नियमित पाणीपुरवठा

पुणे महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अवघ्या २४ तासांत तो स्थगित केला. आता २२ जुलैपर्यंत नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार असून पुढील निर्णय परिस्थितीचा आढावा घेऊन घेतला जाणार

Pune Water Supply: पुणेकरांना मोठा दिलासा! पाणीकपातीवर महापालिकेचा यू-टर्न; ‘या’ तारखेपर्यंत नियमित पाणीपुरवठा

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दिवसाआड पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अवघ्या २४ तासांत पुणे महापालिकेने त्यावर यू-टर्न घेतला आहे. आता शहरात नियोजित पाणीकपात तात्पुरती स्थगित करण्यात आली असून, २२ जुलैपर्यंत नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम काही प्रमाणात दूर झाला असला, तरी प्रशासनाच्या बदलत्या निर्णयांमुळे अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.

यापूर्वी धरणांमधील घटलेला पाणीसाठा लक्षात घेऊन शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जलसंपदा विभागानेही उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी काटकसरीने वापर करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार काही दिवस शहरात पाणीकपात लागू करण्यात आली होती.

दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पाणीकपात तात्पुरती रद्द करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा पावसाने ओढ दिल्याने आणि धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा न झाल्यामुळे बुधवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने जाहीर केला होता.

मात्र, हा निर्णय लागू होण्यापूर्वीच महापालिकेने पुन्हा भूमिका बदलली. महापौर मंजूषा नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत पाणीकपात सध्या लागू केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. २२ जुलैपर्यंत परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

महापालिकेच्या या बदलत्या निर्णयामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी पाणीकपातीचा निर्णय प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला होता, तर आता तो स्थगित करण्याची घोषणा लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. त्यामुळे पाणीपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर नेमका अंतिम निर्णय कोण घेत आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

महापालिकेच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत हवामान विभागाचा अंदाज, धरणांतील उपलब्ध पाणीसाठा, पाण्याची आवक आणि शहरातील पाण्याची मागणी यांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतरच दिवसाआड पाणीपुरवठा लागू करायचा की नियमित पुरवठा सुरू ठेवायचा, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीने करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. पावसाचे प्रमाण अजूनही अपेक्षेपेक्षा कमी असल्याने भविष्यात परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे पाण्याची नासाडी टाळून प्रत्येकाने काटकसरीने वापर केल्यास संभाव्य पाणीटंचाईचा सामना करणे सोपे जाईल, असे प्रशासनाने नमूद केले आहे.

सध्या तरी पुणेकरांना दिवसाआड पाणीपुरवठ्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी २२ जुलैनंतर होणाऱ्या आढावा बैठकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number