पुणे : पुण्यातील धानोरी परिसरातील ‘थिओब्रोमा’च्या आउटलेटमध्ये खराब आणि दुर्गंधीयुक्त खाद्यपदार्थांची विक्री केल्याचा आरोप एका ग्राहकाने केला आहे. संबंधित ग्राहकाने खाद्यपदार्थ खराब असल्याचे लक्षात आल्यानंतर आउटलेटमधील कर्मचाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. तक्रारीनंतर आणखी एक पॅकेट उघडून पाहण्यात आले. त्यामधील खाद्यपदार्थही खराब असल्याचा दावा संबंधित ग्राहकाने केला आहे. तसेच खाद्यपदार्थातून दुर्गंधी येत असल्याचेही ग्राहकाचे म्हणणे आहे. असे असतानाचा विक्रेत्यांकडूनही याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. थिओब्रोमा येथे अन्नसुरक्षा आणि उत्पादनाचा दर्जा यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. तसेच ग्राहकांकडून व्यक्त करण्यात आलेल्या प्रत्येक चिंतेची आम्ही अत्यंत गांभीर्याने दखल घेतो, असे त्यांनी नमूद केले आहे.
विक्रेत्याचे स्पष्टीकरण –
थिओब्रोमा येथे अन्नसुरक्षा आणि उत्पादनाचा दर्जा यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते आणि ग्राहकांकडून व्यक्त करण्यात आलेल्या प्रत्येक चिंतेची आम्ही अत्यंत गांभीर्याने दखल घेतो. संबंधित तक्रार आमच्या निदर्शनास येताच, प्रस्थापित अन्नसुरक्षा प्रक्रियांनुसार आम्ही सविस्तर अंतर्गत गुणवत्ता तपासणी सुरू केली. या प्रक्रियेअंतर्गत उत्पादनाची उपलब्ध गुणवत्ता नियंत्रण नमुन्यांशी तुलना करून पडताळणी करण्यात आली. तपासणीदरम्यान उत्पादन आमच्या निर्धारित गुणवत्ता निकषांबाहेर असल्याचे कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. यानंतर संबंधित आऊटलेटची अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाकडून तपासणी करण्यात आली असून या तपासणीत आऊटलेटला 100 पैकी 100 गुण प्राप्त झाले.
आमच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या व्हिडिओबाबत बोलायचे झाल्यास, त्यामधील विधाने संपूर्ण परिस्थितीच्या संदर्भात समजून घेणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या तक्रारींना प्रतिसाद देतानाच अधिकाधिक आक्रमक होत चाललेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा आमच्या कर्मचाऱ्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये ग्राहकांचा अनुभव मान्य करण्यात आला होता. मात्र त्याचा अर्थ उत्पादनाच्या गुणवत्तेसंदर्भातील कोणत्याही त्रुटीची कबुली किंवा पुष्टी असा होत नाही.
परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तींनी इतर ग्राहक तसेच स्विगी आणि झोमॅटोच्या वितरण भागीदारांना आऊटलेटमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध केला. याचबरोबर त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकारही सुरू ठेवले. या व्यत्ययामुळे तसेच कर्मचारी आणि ग्राहकांच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी आम्हाला पोलिसांची मदत घ्यावी लागली. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संपतराव राऊत यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप केला होता. ते या बाबीची पुष्टी करू शकतात.
अन्नसुरक्षेच्या सर्वोच्च मानकांचे पालन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याचबरोबर आमच्या कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी आणि त्यांना सुरक्षित, सन्मानजनक व सकारात्मक वातावरणात आपली जबाबदारी पार पाडता यावी, यासाठीही आम्ही तितकेच वचनबद्ध आहोत.