Pune Crime: ‘शरीरातील नकारात्मक ऊर्जा काढतो’ म्हणत तरुणीकडे अर्धनग्न फोटोची मागणी; पुण्यात भोंदू बाबाचा पर्दाफाश

पुण्यातून अंधश्रद्धेच्या नावाखाली तरुणीला मानसिक दबावात आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Pune Crime: ‘शरीरातील नकारात्मक ऊर्जा काढतो’ म्हणत तरुणीकडे अर्धनग्न फोटोची मागणी; पुण्यात भोंदू बाबाचा पर्दाफाश

पुणे: पुण्यातून अंधश्रद्धेच्या नावाखाली तरुणीला मानसिक दबावात आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःला आध्यात्मिक गुरू आणि मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाने एका 22 वर्षीय तरुणीकडे अर्धनग्न छायाचित्रांची मागणी केल्याचा आरोप आहे. शरीरातील ‘नकारात्मक ऊर्जा’ दूर करण्याचे आमिष दाखवत हा प्रकार केल्याची तक्रार तरुणीने पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दिव्य जितेंद्र परमार असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सोशल मीडियावर सक्रिय असून तो स्वतःला मोटिव्हेशनल स्पीकर आणि इन्फ्लुएन्सर म्हणून प्रोजेक्ट करत होता. तरुण वयातच विविध ठिकाणी भाषणे देण्यास त्याने सुरुवात केली होती. त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वतःचे चॅनेल सुरू करून त्याने फॉलोअर्सचा मोठा वर्ग तयार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

हेही वाचा: Crime News: वसतिगृहातील कारवाईचा सूड अन् पैशांची हाव; 10 वीच्या 2 विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिकेला 27 वेळा चाकूने वार करून संपवलं

या ओळखीच्या माध्यमातून आरोपी अनेक महिला आणि तरुणींच्या संपर्कात येत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. संबंधित तरुणीचीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्याशी ओळख झाली होती. संवाद वाढल्यानंतर आरोपीने स्वतःला आध्यात्मिक मार्गदर्शन करणारा व्यक्ती म्हणून तिच्यासमोर सादर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या शारीरिक हालचाली आणि प्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगून आरोपीने तरुणीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्याकडून अर्धनग्न फोटो मागण्यात आले. या मागणीमुळे घाबरलेल्या तरुणीने अखेर पोलिसांशी संपर्क साधला आणि संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.

तक्रार मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तपासाचा भाग म्हणून आरोपीचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या उपकरणांमधील संदेश, फोटो, व्हिडिओ आणि इतर डिजिटल माहितीची तपासणी केली जात आहे.

हेही वाचा: Digital Arrest : डिजिटल अरेस्टच्या दोन घटनांमध्ये 79 लाखांचा गंडा; बनावट अटक वॉरंट, जप्तीचे आदेश, कागदपत्रे पाठवून फसवणूक

आरोपीने अशाच पद्धतीने आणखी कोणाला लक्ष्य केले आहे का, याचाही तपास सुरू आहे. प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह अंधश्रद्धा प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेमुळे सोशल मीडियावर स्वतःची ओळख निर्माण करून आध्यात्मिक किंवा मोटिव्हेशनल मार्गदर्शन देणाऱ्या व्यक्तींवर आंधळा विश्वास ठेवण्यापूर्वी सावध राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number