पुणे शहरातील रस्त्यांच्या कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शनिवार पेठ परिसरातील मुठेश्वर मंडळाजवळ रस्त्याचा भाग अचानक खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, रस्त्यावर सिलेंडर ठेवताच त्याठिकाणी मोठा खड्डा पडला आणि सिलेंडर त्यात अडकला. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर महापालिकेच्या रस्ते कामांवर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. शनिवार पेठेतील मुठेश्वर मंडळाजवळील रस्त्यावर हा प्रकार घडला. रस्त्याच्या एका भागावर सिलेंडर ठेवण्यात आला असता अचानक त्या ठिकाणचा पृष्ठभाग खचला. काही क्षणांतच रस्त्यावर मोठा खड्डा तयार झाला आणि सिलेंडर त्यामध्ये अडकला.या घटनेमुळे रस्त्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा आणि कामाची गुणवत्ता याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक आणि वाहने ये-जा करत असताना अशी परिस्थिती धोकादायक ठरू शकते.