पुण्यातील लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी प्रसिद्ध व्यावसायिकाचा मुलगा केतन अग्रवाल याला त्याच्याच होणाऱ्या बायकोने सिया गोयलने आपल्या प्रियकराच्या साथीने धक्का देऊन त्याची हत्या केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात मुख्य आरोपी चेतन आणि सिया यांच्यासह पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. मुख्य आरोपी चेतन चौधरी याचा 23 वर्षीय मित्र रितेश हांगे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येच्या कटाची माहिती रितेशला आधीपासून होती आणि तरीही त्याने पोलिसांना याबाबत कळवले नाही, असा तपास यंत्रणांचा संशय आहे.
न्यायालयाने त्याला 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रितेशच्या अटकेमुळे आता या प्रकरणातील तपासाला नवी दिशा मिळाली आहे. केतन अग्रवाल याची हत्या करण्यापूर्वी त्याला अपंग करण्याचा प्लॅन मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि रितेश हिंगेचा होता. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनच्या हत्येपूर्वीच तिघांनी आपल्या फोनमधून चॅटिंग हटवली होती. मात्र, पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने संपूर्ण डाटा रिक्व्हर केला, तेव्हा पोलिसांच्या हाती तिघांची चॅटिंग लागली. यावेळी केतन अग्रवालच्या हत्येची प्लॅनिंग करताना तिघांची चॅटिंग कोडवर्डमध्ये नसून स्पष्ट शब्दात होती.
यावेळी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल म्हणाले, "जेव्हा चेतन आणि सिया यांनी केतनला आपल्या आयुष्यातून कायमचे दूर करण्याचा कट रचला, तेव्हा त्यांनी रितेश हंगे याच्याशी सविस्तर चर्चा केली होती. एका विशिष्ट चर्चेदरम्यान केतनला शारीरिक इजा पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला. हत्येचे नियोजन करताना अगदी बारकावे रितेशला सांगितले जात होते. रितेश त्यांना सतत पाठिंबा देत होता आणि हा कट प्रत्यक्षात आणण्याच्या योजनेत तो एक सक्रिय सहभागी होता," असे त्यांनी सांगितले.
सध्या सिया आणि चेतन न्यायालयीन कोठडीत असून येरवडा कारागृहात आहेत. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू आहे. आता रितेशच्या अटकेनंतर त्याला या कटाबाबत नेमकी किती माहिती होती, त्याची भूमिका काय होती आणि हत्येपूर्वी आरोपींमध्ये कोणते नियोजन झाले होते, याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे.