वाघोली : वाघोली पोलिसांनी नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेनटर्मिन सल्फेट (टर्मिन) इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत आरोपींकडून 100 टर्मिन इंजेक्शनच्या बाटल्या, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि अन्य साहित्य असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सूरज पद्माकर भुत्ते (वय 19) आणि आकाश गणेश धनवटे (वय 19, दोघेही रा. लोणीकंद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान वाघोली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
बुधवार, 22 जुलै रोजी पहाटे सुमारे 6.15 वाजता आय.व्ही. इस्टेट रोडवरील ऑर्चिड साई प्रॉपर्टीज परिसरात पोलिसांनी सापळा रचला होता. त्यावेळी नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून 30 मिली क्षमतेच्या मेफेनटर्मिन सल्फेट (टर्मिन) इंजेक्शनच्या 100 बाटल्या आणि दुचाकी जप्त करण्यात आली. प्राथमिक चौकशीत आरोपींनी ही इंजेक्शने ऑनलाइन मागविल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत अमली पदार्थ आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या अवैध विक्रीविरोधात कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.