पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावर रविवारी भीषण बहुवाहन अपघात झाला. धायरी पुलाजवळील जांभुळवाडी परिसरात झालेल्या या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याच्या दिशेने पुण्याकडे येणारा एक ट्रक धायरी पुलाजवळील लक्ष्मी लॉजसमोरून जात असताना पुढे असलेल्या टेम्पोवर आदळला. धडक इतकी जोरदार होती की ट्रक आणि टेम्पो हे दोन्ही वाहनं रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली. त्यानंतर मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन कार या वाहनांच्या धडकेत सापडल्या.
या भीषण धडकेनंतर चारही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी पुण्यातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं. भारती हॉस्पिटल, मोरया हॉस्पिटल, सिल्व्हर बर्च हॉस्पिटल आणि श्रेयस हॉस्पिटल येथे जखमींवर उपचार सुरू आहेत.
उपचारादरम्यान हृदयनाथ मोहन गायकवाड आणि आनंदीबाई रामचंद्र वडकर यांचा मृत्यू झाला. अपघातातील 12 जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी गुन्हा क्रमांक 392/2026 नोंदवला आहे. भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील विविध कलमांनुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे. ट्रक चालक प्रमोद विठ्ठल वाघ आणि ट्रक मालक संदीप गोरख सूर्यवंशी यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली असून ट्रक मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
दरम्यान, अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. अपघातग्रस्त वाहनं बाजूला हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अशा अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा पुढील तपास आंबेगाव पोलीस करत असून अपघातामागील नेमकी कारणं तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.