एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. राज्यात ठिकठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. गेल्या महिन्याभरापासून सांगलीच्या एसटी आगारात कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. आज सांगलीतील संपकारी कर्मचाऱ्यांनी रक्तदान करत निषेध केला आहे.
सांगलीत महाविकास आघाडी सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांकडून रक्तदान करत निषेध करण्यात आला. सांगली आगारातील एसटी कर्मचारी गेली २८ दिवस आंदोलन करीत आहेत. मात्र सरकारने हा संप मिटविण्यापेक्षा मेस्मा कारवाईची भीती घालून हा संप चिरडण्याचा प्रयत्न केला. राज्यातील महाविकास आघाडीच्या या धोरणाचा निषेध म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिर घेतले. रक्तसंकलन पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रक्तपेढीच्यावतीने करण्यात आले.
एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन करण्याच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत. दरम्यान विलिनीकरणाची मागणी पूर्ण होईपर्यंत राज्य सरकराने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला. तसेच संप मागे घेण्याचे आवाहनही परिवहन मंत्री अनिल परब कर्मचाऱ्यांना करत आहे. आंदोलन मागे घेतले नाही तर कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही राज्य सरकारने दिला आहे. तसेच अनेक संपकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून अनेकांवर सेवा समाप्तीची कारवाईही राज्य सरकारने केली आहे. तरिही अद्याप कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.