मुंबई: “शेतकरी सुखी तर जग सुखी” या उक्तीला सार्थ ठरवत, गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना अखेर ‘सन्मान निधी’ची मदत मिळणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा बहुप्रतीक्षित 22 वा हप्ता येत्या शुक्रवारी (13 मार्च 2026) थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बळीराजाच्या बँक खात्यात हे योजनेचे पैसे जमा होणार असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळण्याची चिन्हे आहेत.
या निधी वितरणाचा मुख्य सोहळा आसामची राजधानी गुवाहाटी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. गुवाहाटीतून एका क्लिकद्वारे देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात निधी हस्तांतरित केला जाईल. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर, या 22 व्या हप्त्यासाठी राज्यातील एकूण 91 लाख 18 हजार 831 शेतकरी पात्र ठरले आहेत. राज्याचा कृषी विभाग या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या नियोजनात गुंतला असून, जिल्ह्या-जिल्ह्यांत लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण झाले आहे.
आकडेवारीच्या चष्म्यातून पाहिले तर, 21 व्या हप्त्याच्या तुलनेत यंदा लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 19 नोव्हेंबर रोजी दिलेल्या 21 व्या हप्त्यात राज्यातील 90 लाख 41 हजार 241 शेतकरी पात्र होते. मात्र, प्रशासकीय तत्परता आणि ई-केवायसीच्या मोहिमेमुळे यंदा लाभार्थी संख्येत एक लाख दोन हजार 590 शेतकऱ्यांची भर पडली आहे. सुरुवातीला हा हप्ता जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला मिळेल अशी चर्चा होती, मात्र तांत्रिक बाबी आणि काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याला काहीसा विलंब झाला असला, तरी आता ‘देर आए दुरुस्त आए’ या न्यायाने हा निधी उपलब्ध होत आहे.
माननीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी द्वारा प्रधानमंत्री किसान सम्मान निधि (PM-KISAN) की 22वीं किस्त के तहत 9 करोड़ 32 लाख से अधिक किसानों के बैंक खातों में ₹18,640 करोड़ से अधिक की धनराशि का हस्तांतरण किया जाएगा। सिर्फ 3 दिन शेष! 13 मार्च, 2026 #AgriGoI #PMKisan pic.twitter.com/CULvM0kFDK — PM Kisan Samman Nidhi (@pmkisanofficial) March 10, 2026
जिल्हानिहाय विचार करता, अहिल्यानगर जिल्ह्याने यंदाही आपले वर्चस्व कायम राखले आहे. राज्यातील सर्वाधिक लाभार्थी याच जिल्ह्यात असून, तब्बल पाच लाख 45 हजार 280 शेतकरी सन्मान निधीसाठी पात्र ठरले आहेत. त्याखालोखाल पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. ही योजना केवळ आर्थिक मदत नसून, पेरणीच्या तोंडावर किंवा पीक व्यवस्थापनाच्या काळात शेतकऱ्यांच्या हातात मिळणारा एक मोठा आधार आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांनी वर्चस्व कायम राखल्याचे दिसून येते. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने बाजी मारली असून, तब्बल पाच लाख 45 हजार 280 पात्र लाभार्थ्यांसह हा जिल्हा संपूर्ण राज्यात अव्वल ठरला आहे. यानंतर सोलापूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो, जिथे चार लाख 92 हजार 441 शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा होणार आहे.
दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांनीही लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी आघाडी घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चार लाख 64 हजार 869 शेतकरी या लाभासाठी पात्र ठरले आहेत, तर सातारा जिल्ह्यातील चार लाख 38 हजार 668 बळीराजाच्या खात्यात सन्मान निधीची रक्कम जमा होणार आहे. या यादीत पुणे जिल्हा पाचव्या स्थानावर असून, जिल्ह्यातील चार लाख 33 हजार 706 शेतकऱ्यांनी या योजनेचे निकष पूर्ण करत आपले स्थान निश्चित केले आहे. एकूणच, राज्यातील या प्रमुख पाच जिल्ह्यांमध्येच सुमारे 24 लाखांहून अधिक लाभार्थी असून, ही रक्कम ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना देणारी ठरेल.
या निधी वितरणाला राजकीय किनार देखील लाभल्याचे बोलले जात आहे. आसाम आणि पश्चिम बंगालसह काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असतानाच केंद्र सरकारने हा हप्ता जाहीर केला आहे. यापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकांच्या काळात हा निधी वितरित होईल अशी अटकळ होती, परंतु आता 13 मार्चचा मुहूर्त साधण्यात आला आहे. राजकीय गणितं काहीही असली, तरी ऐन उन्हाळ्याच्या चटक्यात शेतीकामांसाठी लागणारा पैसा हातात येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.