पिंपरी-चिंचवड परिसरातील मुंबई-बेंगळुरू महामार्गावर रील्स बनवण्याच्या नादात काही तरुणांनी वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बालेवाडी ते भुजबळ चौक, वाकडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर या प्रकारामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण नवीन गाडीची रील्स तयार करण्यासाठी महामार्गाच्या मधोमध वाहन थांबवून चित्रीकरण करताना दिसत आहेत. रील्स अधिक आकर्षक दिसाव्यात यासाठी त्यांनी इतर वाहनचालकांचा विचार न करता रस्ताच अडवला. परिणामी काही वेळातच महामार्गावर वाहतूक मंदावली आणि मोठी कोंडी निर्माण झाली.
या प्रकारामुळे कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसला. अनेक वाहनचालकांना बराच वेळ वाहतुकीत अडकून राहावे लागले. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे वाहतुकीत अडथळा निर्माण केल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्याची दखल घेत बावधन पोलिसांनी संबंधित रील्स बनवणाऱ्या तरुणांचा शोध सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे संबंधित वाहन आणि तरुणांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, वाहतुकीत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.