पारोळा तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथे बैलपोळ्याच्या दिवशी किरकोळ वादाचे भीषण रूप धारण करत 18 वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बैलाला धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादात मयूर बाळू पाटील (वय 18) याच्यावर धारदार चाकूने वार करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला जळगावला उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, आरोपी घटनेनंतर फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी दुपारी सुमारे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान घडली. बैलपोळ्याच्या निमित्ताने मयूर पाटील आणि त्याचे वडील बाळू पाटील बैलपूजा करून गावाकडे परतत होते. त्यावेळी त्यांच्या बैलाची समोरून येणाऱ्या दुसऱ्या बैलाला धडक लागली. या क्षुल्लक कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू झाला आणि काही क्षणांतच परिस्थिती चिघळली.
वाद वाढताच संशयितांनी मयूरवर धारदार चाकूने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यात मयूरच्या पोटात गंभीर वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने त्याला पारोळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्याचा सल्ला दिला. जळगावकडे नेत असताना एरंडोलजवळ मयूरने अखेरचा श्वास घेतला. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे.
घटनेनंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. पारोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बैलपोळ्यासारख्या आनंदाच्या सणाच्या दिवशी केवळ बैलाला धक्का लागल्याच्या कारणावरून एका 18 वर्षीय तरुणाचा जीव गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून, फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.