Santosh Deshmukh : मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला (Santosh Deshmukh Murder) आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांच्या पहिल्या वर्षश्राद्धाच्या दिवशीही या प्रकरणातील एका आरोपीचा शोध लागलेला नाही. 365 दिवसांपूर्वी झालेल्या या हत्येने केवळ बीड जिल्हा नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. डोळ्यात पाणी आणून आजही देशमुख कुटुंबीय न्याय मिळण्याची प्रतीक्षा करत असून, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र, त्याचा साथीदार कृष्णा आंधळे (Krishna Andhale) अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही, ज्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
हत्येतील राजकीय संबंधांमुळे धनंजय मुंडेंना द्यावा लागला होता राजीनामा
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला राजकीय वळण लागले होते. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड (Walmik Karad) हा बीडचे आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे समोर आले होते. त्यामुळे या संवेदनशील प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार मागणी करण्यात येत होती. राजकीय दबाव वाढल्यामुळे तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या हत्येमागील नेमका हेतू आणि राजकीय लागेबांधे उघडकीस यावेत, अशी मागणी देशमुख कुटुंबीय आणि समर्थकांनी सातत्याने केली आहे.
हेही वाचा – Nanded Crime News: कुटुंब हरलं, प्रेम जिंकलं; नांदेडमध्ये प्रेयसीने केले प्रियकराच्या प्रेतासोबत लग्न
वर्षभरानंतरही एका आरोपीचा छडा नाही; पोलिसांवर टीका
संतोष देशमुख यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी शोक व्यक्त करत संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. मस्साजोगच्या गावकऱ्यांनी आणि देशमुख कुटुंबीयांनी अनेक आंदोलने आणि मागण्या केल्या. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मस्साजोगचे ग्रामस्थ आणि कुटुंबीयांसमवेत अन्नत्याग आंदोलनही केले होते. मात्र, अद्यापही गुन्हेगारांची पाठराखण केली जात आहे, असा आरोप त्यांच्याकडून केला जात आहे.
मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड अटकेत असला तरी, त्याचा साथीदार कृष्णा आंधळे हा वर्षभरापासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार आहे. इतका गंभीर गुन्हा करूनही आरोपी मोकळा फिरत असल्याने, पोलिसांच्या तपास कार्यक्षमतेवर (Investigation Efficiency) आणि कार्यपद्धतीवर तीव्र टीका होत आहे. लवकरात लवकर कृष्णा आंधळेला अटक करून या गुन्ह्यातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी देशमुख कुटुंबीयांनी केली आहे.
Dhananjay Deshmukh : त्या क्रूरकर्म्यांना फाशीची शिक्षा मिळेल, तोच आमच्यासाठी समाधानाचा दिवस
पहिल्या दिवसापासून जो आमचा न्यायाचा लढा सुरू आहे तो अद्यापही आहे. क्रूरकर्म्यांना शिक्षा झाली पाहिजे, हा एकच आमचा उद्देश आहे. म्हणून आम्ही गावकरी आणि कुटुंबीय लढत आहोत. त्यांनी जी वाईट कर्मे केली, त्यातले एक कर्म म्हणजे माझ्या भावाचा खून हेही आहे. त्यांनी सगळ्या कुटुंबाला अनाथ केलं. ज्या लोकांनी निष्पाप भावाला संपवलं त्यांना फाशीची शिक्षा मिळालेला दिवसच आमच्यासाठी समाधानाचा दिवस असेल, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिलीये. दरम्यान, या प्रकरणात चार्जफ्रेम व्हायला वेळ लागत आहे. वेळ काढू पण केला जात आहे, परंतु 12 डिसेंबरला चार्ज फ्रेम होईल. लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल लागला पाहिजे, असे आमचे प्रयत्न असतील. असेही ते म्हणाले.
हेही वाचा – Gauri palwe death case : गौरी पालवे मृत्यूप्रकरणी पती अनंत गर्जेला अटक; पोलिसांच्या तपासाला वेग
संतोष देशमुख यांची कन्या वैभवी NEET उत्तीर्ण
या संपूर्ण कठीण परिस्थितीतही संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हिने तिच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. तिने बारावीच्या परीक्षेत 85.33 टक्के गुण मिळवले. तसेच, NEET परीक्षेतही यश मिळवले. तिचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. वैभवी देशमुख हिने वडिलांच्या फोटोसमोर उभे राहून आपण त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. तसेच, आता मिळालेल्या या यशाबद्दल पाठ थोपटण्यासाठी ते या जगात नाहीत, असे दुःखही तिने व्यक्त केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.