जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पाळीव प्राण्यांना सांभाळणाऱ्या पुणेकारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लवकरचं पुण्यात पाळीव प्राण्यांच्या संख्येवर बंधन येणार असून पुणे महानगरपालिका यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या आणि प्राणी पाळण्याची इच्छा असणाऱ्यांनी किती आणि कोणते प्राणी पाळावे यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने स्वतंत्र धोरण आखण्यात येत आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभेत याविषयीचा स्वतंत्र ठराव मंजूर करण्यात आला आहे.
पुणे शहरातील सोसायट्या, अपार्टमेंट आणि बंगल्यांमध्ये प्राणी पाळणारे अनेक कुटूंबिय आहेत. परंतु हे प्राणी पाळताना त्याची स्वच्छता कशी राखावी आणि त्यांचे संगोपन कसे करावे, याचे कुठलेही नियम सध्या अस्तित्वात नाहीत. या पाळीव प्राण्यांच्या त्रासामुळे अनेक नागरिकांनी पोलिसात तक्रारीही केल्या आहेत. तर काही ठिकाणी मारहाण झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. पाळीव प्राण्यांबाबत कोणत्याही प्रकारची नियमावली नसल्याने अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागते परिणामी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. याला आळा घालण्यासाठी पालिकेने नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने पाळीव प्राण्याबाबत धोरण तयार करावे, असे पत्र शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी महिला व बाल कल्याण समितीला दिले होते. यावर महापालिकेने गांभीर्याने विचार सुरु केलाय.