Pune-Mumbai Trains : पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणारा रेल्वे मार्ग राज्याची 'जीवनवाहिनी' मानला जातो. मात्र, सध्या या मार्गावरील प्रवाशांना एका विचित्र समस्येचा सामना करावा लागत आहे. सकाळी साडेनऊच्या वंदे भारतनंतर थेट दुपारी सव्वातीन वाजेपर्यंत मुंबईसाठी एकही हक्काची ट्रेन उपलब्ध नाही. तब्बल सहा तासांचा हा मोठा 'गॅप' प्रवाशांच्या त्रासात भर घालत असून, तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेचे स्वप्न गेल्या अनेक वर्षांपासून अजूनही कागदावरच आहे.
दुपारचा प्रवास म्हणजे एसटी किंवा खासगी कॅबचा आधार
पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सकाळच्या महत्त्वाच्या गाड्यांचे वेळापत्रक पाहिले तर त्यात सिंहगड एक्सप्रेस (6:05), डेक्कन क्वीन (7:15), प्रगती एक्सप्रेस (7:45) आणि वंदे भारत (9:20) यांचा समावेश होतो. मात्र, यानंतर थेट दुपारी 3:15 वाजता डेक्कन एक्सप्रेस उपलब्ध आहे. या दरम्यानच्या सहा तासांत व्यवसाय, नोकरी किंवा तातडीच्या कामासाठी मुंबईला जाणाऱ्या हजारो प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. लांब पल्ल्याच्या काही गाड्या असल्या तरी त्यातील गर्दीमुळे तिकीट मिळणे किंवा शिरकाव करण्यासाठी जागा मिळणे दुरापास्त असते. परिणामी, प्रवाशांना नाईलाजास्तव महागड्या खासगी कॅब किंवा एसटीचा पर्याय निवडावा लागतो. ज्यामुळे एसटीमध्ये गर्दीचा सामना करावा लागतो. तर, एक्सप्रेस-वेवर वाहनांचा ताण वाढतोय.
तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काय झाले?
पुणे-मुंबई दरम्यान रेल्वे गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी तिसरी आणि चौथी मार्गिका हाच एकमेव 'गेमचेंजर' पर्याय आहे. अलीकडेच केंद्राने बदलापूर-कर्जत या 32 किलोमीटरच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी दिली असली, तरी पुणे-लोणावळा दरम्यानच्या 63 किलोमीटरच्या प्रकल्पाचे काम अजूनही संथ गतीने सुरू आहे. या दोन अतिरिक्त मार्गिका झाल्यास मेल-एक्सप्रेस आणि लोकल गाड्या स्वतंत्रपणे धावू शकतील, ज्यामुळे क्रॉसिंगसाठी गाड्यांना थांबवण्याची गरज उरणार नाही आणि तासाला एक गाडी सोडणे शक्य होईल. या प्रकल्पासाठी सुमारे 5,100 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
रस्त्यावरील ताण कमी करण्यासाठी रेल्वेच उत्तम पर्याय
पुणे-मुंबई हा देशातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. रेल्वेने दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. जर रेल्वे प्रशासनाने सकाळी साडेनऊनंतर किमान दोन विशेष गाड्या सुरू केल्या, तर रस्ते वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. नियमित प्रवाशांच्या मते, केवळ घोषणा करण्यापेक्षा सरकारने प्रत्यक्षात गाड्यांची संख्या वाढवणे आणि रखडलेल्या मार्गिकांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करणे गरजेचे आहे, तरच पुणेकरांचा मुंबई प्रवास सुसह्य होईल.
बजेट 2026 मध्ये हायस्पीड रेल्वेची घोषणा, पण लोकलचे काय?
नुकत्याच सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्प 2026 मध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी 23,926 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. यात मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली असून, हा प्रवास अवघ्या 48 मिनिटांत होणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हा प्रकल्प पूर्ण होण्यास अजून काही वर्षे लागणार आहेत. तोपर्यंत सध्याच्या रेल्वे मार्गावरील सहा तासांची 'दरी' भरून काढण्यासाठी अतिरिक्त इंटरसिटी किंवा विशेष गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.