देशभरात गाजत असलेल्या ‘नीट 2026’ पेपरफुटी प्रकरणात आता लातूरचे नाव समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक आणि पुण्यानंतर आता लातूरमधील एका खासगी क्लासेसच्या मॉक टेस्टमधील तब्बल 42 प्रश्न ‘नीट’च्या मुख्य परीक्षेत जशास तसे आल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी एका विद्यार्थ्याच्या पालकाने थेट लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडे तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तक्रारीनुसार, संबंधित खासगी क्लासेसने परीक्षेपूर्वी घेतलेल्या मॉक टेस्टमध्ये विचारले गेलेले अनेक प्रश्न मुख्य ‘नीट’ परीक्षेत हुबेहूब आढळले. त्यामुळे पेपरफुटी रॅकेटचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालकांनी आपल्या तक्रारीत संबंधित क्लासेसचा आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटशी संबंध असू शकतो, अशी शंका उपस्थित केली आहे. या तक्रारीनंतर लातूर पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या असून, संबंधित क्लासेसची माहिती, मॉक टेस्टचे प्रश्नपत्रिका संच आणि इतर व्यवहारांची चौकशी केली जात आहे. दरम्यान, ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आधीच नाशिक आणि पुण्यापर्यंत पोहोचले असल्याची चर्चा सुरू असताना आता लातूर कनेक्शन समोर आल्याने तपास अधिक गंभीर झाला आहे. या चौकशीत आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘नीट’सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत असल्याची भावना पालकांकडून व्यक्त होत आहे. आता पोलिसांच्या चौकशीत नेमकं काय समोर येतं, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.