Maharashtra Earthquake: महाराष्ट्र पुन्हा हादरले! मध्यरात्री नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के, ग्रामस्थांमध्ये भीती

नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरगाणा, कळवणसह अनेक भागांत कंपन जाणवले, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Maharashtra Earthquake: महाराष्ट्र पुन्हा हादरले! मध्यरात्री नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के, ग्रामस्थांमध्ये भीती

नाशिक: नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसल्यानंतर मध्यरात्री पुन्हा जमीन हादरल्याने अनेक गावांतील नागरिक घाबरून घराबाहेर पडले. सलग दोन दिवस भूकंपाचे हादरे जाणवल्यामुळे प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे 11.55 ते 11.56 वाजण्याच्या दरम्यान सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील विविध भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर पहाटेपर्यंत काही भागांत सौम्य कंपनांची नोंद झाली. भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केलवर 3.6 इतकी नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचा: Thackeray Brothers Rally: ठाकरे बंधूंकडून विद्यार्थी आंदोलकांसाठी विजयी रॅली! दादर पोलिसांकडून नागरिकांसाठी महत्वाची सूचना जारी

सुरगाणा तालुक्यातील बोरगाव, सराड, चिखली तसेच कळवण तालुक्यातील दळवट परिसरात नागरिकांना स्पष्टपणे धक्के जाणवले. याशिवाय दिंडोरी तालुक्यातील ननाशी, बागडीचा पाडा आणि पेठ तालुक्यातील शिवशेत परिसरातही कंपनांची नोंद झाली. मध्यरात्री अचानक घरातील वस्तू हलल्याचा अनुभव काही नागरिकांनी सांगितला, तर अनेकजण भीतीपोटी घराबाहेर येऊन सुरक्षित ठिकाणी थांबले.

यापूर्वी शनिवारी सकाळीही बोरगाव परिसरात भूकंपाचे धक्के बसले होते. त्यानंतर काही तासांतच पुन्हा मध्यरात्री जमीन हादरल्याने स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. वारंवार जाणवणाऱ्या या धक्क्यांमुळे पुढे आणखी भूकंप होणार का, अशी भीती अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. कोणतीही दुर्घटना घडलेली नसून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संबंधित यंत्रणा परिसरावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा: Amravati News: धक्कादायक प्रकार! अचानक विद्यार्थ्यांना पोटदुखी, मळमळ, उलट्या…, अमरावतीच्या आश्रम शाळेतील बाधित विद्यार्थ्यांची संख्या वाढली

महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन केंद्र तसेच स्थानिक प्रशासनाकडून भूकंपाच्या हालचालींचे निरीक्षण सुरू असून तज्ज्ञांकडून माहिती संकलित केली जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे आणि सोशल मीडियावरील अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भूकंपाचे धक्के सौम्य असले तरी सलग दोन दिवस झालेल्या घटनांमुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करत नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number