Mumbai Water Cut : बीएमसीचा मोठा निर्णय! मुंबईतील सातपैकी 4 धरणे ओसंडून वाहू लागली; तरीही पाणीकपात कायम राहणार

जलाशयांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाला असला तरीही 15 मे पासून लागू केलेली 10 टक्के पाणीकपात मागे घेण्यास मुंबई महापालिकेने स्पष्ट नकार दिला आहे.
Mumbai Water Cut : बीएमसीचा मोठा निर्णय! मुंबईतील सातपैकी 4 धरणे ओसंडून वाहू लागली; तरीही पाणीकपात कायम राहणार

Mumbai Water Cut Update: मुंबई महानगरपालिकेला (BMC) दररोज 4000 दशलक्ष लिटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या 7 प्रमुख धरणांमधील एकूण साठा 10.09 लाख दशलक्ष लिटरवर म्हणजेच एकूण क्षमतेच्या सुमारे 70 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांत पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे मोडक सागर, विहार, तुळशी आणि तानसा ही 4 धरणे पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागली आहेत. यांपैकी मोडक सागर धरण मध्यरात्री 2:07 वाजता ओसंडून वाहू लागल्याने पालिकेने त्याचा एक दरवाजा उघडला आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये 'एल निनो'चा धोका
जलाशयांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाला असला तरीही 15 मे पासून लागू केलेली 10 टक्के पाणीकपात मागे घेण्यास मुंबई महापालिकेने स्पष्ट नकार दिला आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत 'एल निनो'च्या प्रभावामुळे पाऊस कमी पडण्याची किंवा अनिश्चित राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सध्यातरी कपात मागे न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य पाटबंधारे विभागाचे 31 ऑगस्टपर्यंतच्या नियोजनाचे आदेश
राज्य पाटबंधारे विभागाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पुढील वर्षाच्या 31 ऑगस्टपर्यंत पुरेल अशा प्रकारे पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा हा पुढील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंतचा पुरवठा करण्यासाठी पुरेसा आहे. परंतु, संपूर्ण वर्षाचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सातही धरणांमध्ये एकूण 14.47 लाख दशलक्ष लिटर पाण्याचा साठा असणे आवश्यक मानले जाते.

हेही वाचा – Pune Water Supply Update: पुणेकरांसाठी गूड न्यूज! तूर्तास कोणतीही पाणीकपात नाही; खडकवासला धरण साखळीत समाधानकारक साठा जमा

सप्टेंबर अखेर 100 टक्के साठा झाल्यासच निर्बंध हटणार
अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले की, सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व जलाशयांमध्ये 100 टक्के पाणीसाठा जमा झाला, तरच ही 10 टक्के पाणीकपात मागे घेतली जाईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्याची स्थिती उत्तम असली तरी आगामी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पालिकेने पाणी राखून ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे मुंबईकरांना 30 सप्टेंबरपर्यंत सध्या लागू असलेल्या या पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन
मुंबईला मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि तानसा या सात धरणांतून पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या चार धरणे ओसंडून वाहत असली तरी उर्वरित मोठ्या धरणांची पातळी पूर्ण होणे बाकी आहे. आगामी काळात पाण्याच्या तुटवड्याला सामोरे जावे लागू नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून सर्व नागरिकांना दैनंदिन वापरामध्ये पाण्याचा अपव्यय टाळून जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात जुलैअखेर मुसळधार; ऑगस्ट सुरू होताच पावसाचा जोर ओसरणार, 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version